‘महाराष्ट्र बंद यशस्वी करा’; महाविकास आघाडीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आवाहन

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील योगी सरकार कडून घडला आहे. त्याला केंद्रातील मोदी सरकारही पाठीशी घालत आहे.

  सांगली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून घडला आहे. त्याला केंद्रातील मोदी सरकारही पाठीशी घालत आहे. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.११) महाविकास आघाड़ी व मित्र पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पक्षातील जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली.

  यावेळी सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि आनंदराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बाबासाहेब मुळीक आदी उपस्थित होते.

  शेतकऱ्यांवर भाजपकून अन्याय, अत्याचार

  पृथ्वीराज पाटील म्हणाले, या प्रकाराचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्र सरकारकडून व भाजपशासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय, अत्याचार होत आहेत. भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीलाही लाजवेल अशा प्रकारचे आहे. शेतकऱ्यांवरील हल्ल्याबद्दल शरद पवार यांनी भाजपा सरकारला खडेबोल सुनावले आहेत. या प्रकारणाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना तुरुंगात डांबून इंग्रज राजवटीचा परिचय भाजप सरकारने करून दिला आहे.

  यासंदर्भात माहिती संजय विभूते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने आधीच तीन काळे कायदे करुन देशभरातल्या शेतकऱ्यावर मोठा अन्याय केलेला आहे आणि तशातच आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपणाची वागणूक देत आहेत. नवी दिल्लीतही तेच झाले आणि आता लखीमपूर खिरीमध्येही केंद्रातील एका मंत्र्याच्या मुलानेच गाडी अंगावर घालून शेतकऱ्यांना चिरडले आहे.

  महेश खराडे म्हणाले, लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांना सामुहिकरित्या ठार मारण्याची घटना जनरल डायरने केलेल्या हत्याकांड आठवण देणारी आहे. अशा या क्रूर अत्याचारी भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहेत. राज्यातील महाविकास आघाडी व मित्र पक्षाने सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातही बंद पाळण्यात येणार आहे.

  शांततेचे आवाहन

  सोमवारी बंदमध्ये शेतकरी, व्यापारी यांनी सहभाग घ्यावा मात्र, या आंदोलनात कोठेही गालबोट लागू नये, सर्वांनी शांततेत उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, सोमवारी सकाळी ९ वा. स्टेशन चौक येथे निषेध सभा व निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.