सांगली जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसी उपलब्ध करा; संजयकाका पाटलांची मागणी

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून लसींची पूर्तता व्हावी, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. त्यासोबतच सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने केंद्रीय पथक पाठवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाला त्याबद्दल मार्गदर्शन करावे, अशीही मागणी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

    खासदार संजयकाका पाटील यांनी मंत्रीमहोदयांकडे मागणीनुसार, सांगली जिल्ह्यात गेल्या ३ महिन्यांपासून लॉकडाउन परिस्थिती असून, त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार, दुकाने बंद आहेत. संपूर्ण जिल्ह्यात फक्त अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सुरु असूनही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊ शकली नाही. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

    गेल्या ३ महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात कडक निर्बंधात लॉकडाऊन सुरु असल्याने सर्व व्यापार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे व्यापारी, छोटे दुकानदार, फेरीवाले, रोजंदारीवर उपजीविका करणारे कामगार, छोटे उद्योजक यांना खूप मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. कोरोना परिस्थितीवर आजपर्यंत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यास त्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली दिसून येत नाही. परंतु, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील व्यापारी, छोटे दुकानदार, फेरीवाले, रोजंदारीवर उपजीविका करणारे कामगार, छोटे उद्योजक यांना मात्र कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागलेचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

    सद्यपरिस्थितीत सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवणे हीच उपाययोजना कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लोकसंख्येनुसार सांगली जिल्ह्यासाठी लसींचा पुरवठा करून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंतीही खासदार संजयकाका पाटील यांनी पत्राद्वारे केली.

    तसेच सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय पथक पाठवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाला त्याबद्दल मार्गदर्शन करावे, अशीही खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन मागणी केली.