कदाचित नाना पटोले सुद्धा आमच्या सोबत पुन्हा येऊ शकतात; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

राजकारणात काहीही होऊ शकतं. कदाचित नाना पटोले सुद्धा आमच्या सोबत पुन्हा येऊ शकतात. पण राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे सत्तेत राहील, अशी परिस्थिती नाही. हे सरकार घालवून आमचं सरकार आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट रामदास आठवलेंनी केलाय.

    सांगली : अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्यात सरकार पडेल असे भाष्य केल्यानंतर खळबळ उडाली असतानाच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही गौप्यस्फोट करून भर टाकली आहे. राज्यातील सरकार घालवण्याचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व आमचे प्रयत्न सुरू आहेत असे ते म्हणाले.

    राजकारणात काहीही होऊ शकतं. कदाचित नाना पटोले सुद्धा आमच्या सोबत पुन्हा येऊ शकतात. पण राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे सत्तेत राहील, अशी परिस्थिती नाही. हे सरकार घालवून आमचं सरकार आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट रामदास आठवलेंनी केलाय.

    दरम्यान, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि कोरोनाची परिस्थिती देखील गंभीर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार करावा लागेल, असे आठवले म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ येऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम करून कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी,’ असं मतही आठवले यांनी व्यक्त केले.