शित्तूर-उदगीरी रोडवर बहरलेले ‘मिनी कास पठार’ पर्यटकांच्या प्रतिक्षेत!

पठारावर प्रवेश करण्याअगोदर सडयापासुन दोनशे ते तिनशे फुट अंतरापर्यंत पसरलेल्या विविध वनस्पती व गवताचे गालीचे पर्यटकांना अक्षरशा वेड लावत आहेत.तर सड्यावरील पठारावर प्रवेश करताच थंडगार अंगाला झोंबणारा गार वारा, सडयावरील काथळ दगडावर उमललेली शितेची आसवे, निलीमा तसेच विविध प्रकारची फुललेली फुले पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहे.

    विजय पाटील, शिराळा : नैसर्गिक सौंदर्यानं संपन्न असलेल्या शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर-वारूण ते उदगीरी या मार्गावरील सड्या दरम्यान विविध जातीच्या वेली फुलांनी बहरलेले पठार पर्यटकांना सध्या खुणावत आहे.

    हे पठार सध्या सितेची आसवे, निलीमा, लाल गालीचा, जांभळी मंजीरी, पांढरे शुभ्र गेंद, दिपकाडीच्या व निळ्याशार आभाळी फुलांनी हे पठार सजले असून जणू हे पठार सध्या ‘मिनी कास पठार’च ठरु लागले आहे. शिराळा तालुक्यातील आरळा येथुन शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर-वारुण – राघुवाडा ते उदगीरी या मार्गावर अगदी रस्त्यालगतच हे पठार आहे.आरळा ते उदगीरी सडा कास पठार हा अंदाजे दहा किलोमिटर अंतराचा नागमोडी वळणाचा डांबरीकरण झालेला मार्ग आहे. हे पठार ज्याक्षणी नजरेस पडते.त्याक्षणी माणसाची तहानभुक हरपुन जाते.

    पठारावर प्रवेश करण्याअगोदर सडयापासुन दोनशे ते तिनशे फुट अंतरापर्यंत पसरलेल्या विविध वनस्पती व गवताचे गालीचे पर्यटकांना अक्षरशा वेड लावत आहेत.तर सड्यावरील पठारावर प्रवेश करताच थंडगार अंगाला झोंबणारा गार वारा, सडयावरील काथळ दगडावर उमललेली शितेची आसवे, निलीमा तसेच विविध प्रकारची फुललेली फुले पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहे. दुपारनंतर पठारावर पसरलेली दाट धुक्यांची झालर पर्यटकांना मोहीत करून टाकत आहे.कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून पर्यटकांवाचून सुने-सुने असलेल्या या पठारावरील मनमोहक दृश्य ऐन गणेशोत्सवाच्या काळात पर्यटकांना अक्षरशः साद घालत आहे.