वाळवा तालुक्यात २७ हजारांहून अधिक लसीकरण

    वाळवा : महालसीकरण अभियानास इस्लामपूर-आष्टा शहरासह ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वच लसीकरण केंद्रावर मतदान केंद्रांसारख्या रांगा लागल्या होत्या. इस्लामपूर व आष्टा शहरात पाच हजारहून तर ग्रामीण भागात सुमारे 21 हजारहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली.

    कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी १८ वर्षावरील सर्व नागरीकांसाठी महालसीकरण अभियान राबवण्यात आले. हे अभियान राबवण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर, आशा वर्कर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी यांनी उत्कृष्टपणे नियोजन केले. इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी व शिराळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकाधिक लसीकरण करून घेण्यास प्रयत्नशील होते.

    वाळवा तालुक्यामध्ये लसीकरण अभियान अंतर्गत ग्रामीण भागाचे एकूण 21482 तसेच शहरी भागात एकूण 5782 एकूण तालुक्याचे लसीकरण 27264 इतके झाले असल्याची माहिती वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी दिली.