शेतकऱ्यांच्या पैशातून खासदारांनी मथुरेत खरेदी केली राईस मिल; महेश खराडे यांचा आरोप

    सांगली : खासदार नागेवाडी कारखान्याच्या ४० कोटी उचल फेब्रुवारी महिन्यातच उचलली. ते ४० कोटी कुठे गेले? याशिवाय मोलासिस विक्रीतून आलेले सहा कोटी असे शेतकऱ्याच्या ४६ कोटीतून खासदारांनी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे राईस मिल खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला आहे.

    शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्याच्या तोंडचा घास हिरावून पाप आणि पुण्याईची भाषा करणारे संजयकाका शेतकऱ्याच्या उसाच्या पैशातून स्वतःची मालमत्ता वाढवत सुटले आहेत. त्यांनी बस्तवडे, तासगाव, चीखलगोठन, सांगलीसह राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता विकत घेतल्या आहेत. राज्यात त्याची प्रचंड मालमत्ता आहेच, मात्र आता त्यांनी राज्याबाहेरही मालमत्ता विकत घ्यायचा सपाटा लावला आहे. आमचा मालमत्ता विकत घ्यायला विरोध नाही मात्र शेतकऱ्याच्या घामाच्या आणि हक्काच्या पैशातून ते स्वः विकास साधत आहेत, याला आमचा विरोध आहे, असे त्यांनी सांगितले.

    दोन्ही कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना जानेवारीपासून एक रुपयाही दिलेला नाही. याउलट जिल्हा बँकेतून ४० कोटीची उचल साखर पोत्यांवर फेब्रुवारी महिन्यात घेतली. त्या पैशातून सर्व शेतकऱ्याची एफआरपी देणे शक्य होते. मात्र, शेतकऱ्यांचे ऊस बिल त्यांनी भागविलेच नाही. ते पैसे त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या आग्रहावरून ७३ कोटीला राइस मिल खरेदी केली आणि शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला.

    गेल्या पाच महिन्यांपासून शेतकरी हेलपाटेमारत आहेत. कुणाच्या मुलीचे लग्न खोळंबले आहे, अनेकांना आईचा, वडिलाचा, पत्नीच्या दवाखान्याचा खर्च व्याजाने पैसे काढून करावा लागला आहे. बिल न मिळाल्याने अनेक शेतकऱ्याच्या मुलांना ऍडमिशन घेता आली नाहीत. नुसत्या तारखा मिळत गेल्या. गोरगरीब शेतकऱ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी करण्याचा गोरखधंदा त्यांनी बंद करावा. हक्काचे पैसे तात्काळ द्यावेत, अन्यथा त्याच्या बंगल्यासमोर आम्हाला नाइलाजने बसावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

    याशिवाय त्यांनी जिल्हा बँकेची फसवणूक केली आहे. डिव्हाईन फूडच्या माध्यमातून ३६ कोटीची कर्जे थकविले आहे. १५० कोटीची मालमत्ता असलेला तासगाव कारखानाही त्यांनी केवळ ३४ कोटीमध्ये लाटला आहे. २७ हजार सभासद शेतकऱ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले. ज्या सभासद शेतकऱ्यांनी त्यांना दोनदा खासदार केले त्यांनाच त्यांनी बेदखल केले आहे, असा आरोप त्यांनी केला.