भाजप खासदार संजय पाटील यांच्यावर ‘स्वाभिमानी’च्या जाधव यांनी केला ‘हा’ आरोप

    सांगली : खासदार संजय पाटील व त्यांच्या तासगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. बिले देण्याची आश्वासने ते पाळत नाहीत, म्हणून गुरुवारपासून तासगाव तहसीलदार कार्यालयात संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषण करणार आहेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव यांनी दिला आहे.

    याबाबतचे निवेदन तहसीलदार कल्पना ढवळे यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, शेतकऱ्यांनी ७ जून रोजी तासगाव शहरात रास्ता रोको व खासदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी पुढील चार ते पाच दिवसांत बिले देण्याचे आश्वासन खासदार पाटील व आर. डी. पाटील यांनी दिले होते, ते त्यांनी पाळले नाही.

    यानंतर १८ जून रोजी दुसरे निवेदन देऊन २६ जूनला आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावेळीही कार्यकारी संचालक पाटील यांनी दि. २० जून रोजी बैठक घेतली होती. त्या बैठकीत खोटे धनादेश दाखवून दोन दिवसात सर्व बिले जमा करू, असे सांगून आम्हा शेतकऱ्यांची दिशाभूल केली. शेतकऱ्यांचा रोष आणि त्यांच्या अडचणी पाहता आंदोलनाशिवाय पर्यायच नाही, म्हणून गुरुवारी तहसीलदार कार्यालयातच स्वाभिमानीचे पदाधिकारी उपोषणास बसणार आहेत.

    शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन प्रमुख मार्गावरून मोर्चा काढत तहसीलदार कार्यालयात शेतकरी जातील. यापुढे पोकळ आश्वासनावर आम्ही माघार घेणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील. निवेदनावर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, तालुकाध्यक्ष जाधव, पोपट मोरे आणि संदीप राजोबा यांच्या सह्या आहेत.