रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करण्याची गरज : जयंत पाटील

सध्या सांगली जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी करावेत. कोरोनाचे रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी का पडताहेत, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उपचाराच्या प्रक्रियेत सुधारणा होणे गरजेचे आहेत.

सांगली: सांगलीत (sangali)  दक्षिण भारत जैन सभेच्या पुढाकाराने पन्नास लाख रुपये खर्च करून ४० बेडचे अद्ययावत चोपडे मेमोरियल ट्रस्ट कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. त्याचे लोकार्पण रविवारी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोना संसर्गाच्या भीतीने डॉक्टरांकडून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत. अनेक ठिकाणी रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर, अशी स्थिती आहे. यामुळे मृत्यूदरात वाढ होत आहे. ही स्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट (Need to audit doctor’s work with hospital bills ) करावे लागेल , असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित

अनेक रुग्णालयांबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टर बाहेर आणि पेशंट आत हे बरोबर नाही. डॉक्टर आतच जात नसतील तर उपचार कसे होणार? हा प्रकार गंभीर आहे. मी यावर कधी बोललो नाही, पण आता मृत्यू दर कमी येत नसल्याने यावर बोललेच पाहिजे. रुग्णांची काळजी डॉक्टरांनी घेतली तरच मृत्यू दर कमी होईल. ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज आहे. याबाबत आमच्यासह डॉक्टरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

पुढे म्हणाले की, सध्या सांगली जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी करावेत. कोरोनाचे रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी का पडताहेत, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उपचाराच्या प्रक्रियेत सुधारणा होणे गरजेचे आहेत. काही डॉक्टर व कर्मचारी आवश्यक ते प्रयत्न करताहेत मात्र सर्वच ठिकाणी जर अपेक्षित उपचार प्रक्रिया राबविली तर मृत्यूदर कमी होऊ शकतो.