केरळातील १०० किलो सोने तस्करी प्रकरणी एनआयएची सांगली जिल्ह्यात छापेमारी

  सांगली/प्रविण शिंदे : दुबईतून केरळमार्गे १०० किलो सोन्याची तस्करी सांगली जिल्ह्यात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एनआयएच्या पथकाकडून सांगली जिल्ह्यात छापे टाकण्यात आले आहेत. जुलै २०२० मध्ये केरळमध्ये सोने तस्करीचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर ते १०० किलो सोने सांगली जिल्ह्यात पाठवल्याची माहिती आली आहे. त्यामुळे एनआयएचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.

  १०० किलो सोन्याची सांगलीत तस्करी

  सांगली जिल्हा पुन्हा एकदा एनआयएच्या रडारवर आला आहे. दुबईमधून जुलै २०२० मध्ये केरळ येथे १०० किलो सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी केरळ कस्टम कडून १५ जणांना अटक करण्यात आले होते. सोने तस्करीची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास एनआयएकडे देण्यात आला होता. एनआयएकडून ९ जून रोजी सोने तस्करीचा मुख्य सूत्रधार मोहम्मद मन्सूर याला अटक करण्यात आली आहे. तपासामध्ये मन्सूर याने १०० किलो सोने सांगली जिल्ह्यात पाठवल्याची कबुली दिली.

  एनआयएकडून जिल्ह्यात छापे

  एनआयएच्या पथकाकडून १०० किलो सोने तस्करी प्रकरणी सांगली जिल्ह्यात छापे टाकण्यात आले आहेत. शनिवारी एनआयएच्या पथकाने जिल्ह्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि तासगाव तालुक्यात तपासासाठी छापे टाकण्यात आले. मन्सूरने दिलेल्या माहितीवरून हे कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईबाबत एनआयएकडून गुप्तता पाळण्यात आली आहे.

  सोने तस्करी आणि सांगली कनेक्शन

  दिल्लीमध्ये गेल्या वर्षी रेल्वे स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी उघडकीस आले होते आणि त्याचे कनेक्शन सांगलीचे असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे एनआयएचे पथक पहिल्यांदा सांगली जिल्ह्यात आले होते. या पथकाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. आता दुबईमधून केरळमार्गे करण्यात आलेल्या तस्करीमध्येही सांगली कनेक्शन समोर आल्याने एनआयएचे पथक दुसऱ्यांदा सांगली जिल्ह्यात दाखल झाले.