शिवसेनेसोबतच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

जनतेचे अनेक प्रश्न घेऊन आता भाजपला रस्त्यावर उतरावे लागेल. या सरकारला 'सळो की पळो करून सोडावे लागेल. या मतदारसंघात महापुरामध्ये लोकांना कोणतीही मदत केली नसेल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करा.

  सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीत आमची शिवसेनेबरोबर युती अजिबात होणार नाही. त्यामुळे इस्लामपूर आणि पलूस-कडेगाव हे दोन्ही मतदारसंघ भाजपच ताकदीने लढणार आहे. पलूस-कडेगावमध्ये संग्रामसिंह देशमुख हेच आमचे उमेदवार असतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी येथे जाहीर केले.

  पलूस येथील भाजप कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीत इस्लामपूर आणि पलूस कडेगाव हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेला सोडले. ती आमची चूक होती. त्या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार असते तर जयंत पाटील व विश्वजित कदम यांना घरी बसावे लागले असते.

  ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तीनही पक्षांचे मंत्री ठाण मांडून बसले होते, तरीही पंढरपूरची जागा आम्हीच जिंकली. कृष्णा कारखान्याची निवडणूक आम्हीच जिंकली. त्या निवडणुकीमध्ये मंत्री डॉ. विश्वजित कदम ठिय्या मांडून प्रचार करीत होते. तरीसुद्धा त्यांना यश मिळाले नाही. यावेळी कुंडलमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्वागत भाजपचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी आभार मानले. पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

  पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी पाटील, पंचायत समितीचे सभापती दीपक मोहिते, सदस्य रामचंद्र वरुडे, श्रीरंग सीमा मांगलेकर, भाजपचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमीर पठाण, दीपक कदम, जयवंत मगर पाटील उपस्थित होते.

  निवडणुकीच्या तयारीला लागा

  जनतेचे अनेक प्रश्न घेऊन आता भाजपला रस्त्यावर उतरावे लागेल. या सरकारला ‘सळो की पळो करून सोडावे लागेल. या मतदारसंघात महापुरामध्ये लोकांना कोणतीही मदत केली नसेल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करा. रास्ता रोको करा. गावागावात जाऊन पक्ष रुजवा भाजप सरकारने पुरामध्ये कोणती मदत केली. आत्ताच्या सरकारने काय केले ते लोकांना समजले पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांतील विजयासाठी आत्तापासूनच तयारीला लागा.

  …तर निवडणुका होऊ देणार नाही

  देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले; परंतु या सरकारला ते टिकवता आले नाही. मंत्री अशोक चव्हाण हे मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार साठ वर्षे होते. तेव्हा त्यांना आरक्षण का देता आले नाही? येणाऱ्या निवडणुकीत सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही. मात्र, ओबीसींचे राजकीय आरक्षण ठरल्याशिवाय भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही.