कार्यकर्त्यांनो, आक्रमक व्हा; भाजप प्रदेशाध्यक्षांचा आदेश

कार्यकर्त्यांनी शासन, प्रशासनाच्या केसेसना घाबरू नये. कार्यकर्त्यांनी मनोबल वाढवले पाहिजे. आक्रमक झाले पाहिजे. ‘अ‍ॅटॅक इज द बेस्ट डिफेन्स’नुसार कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हावे.

  सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ आणि केवळ पोलिसांच्या आणि गुंडांच्या सहाय्याने चालले आहे. सरकारमधील तीन पक्षांची शेवटची फडफड सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांनीही आक्रमक व्हावे. ‘अ‍ॅटॅक इज बेस्ट डिफेन्स’नुसार आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घ्यावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

  भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, दिनकर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, दीपक शिंदे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर प्रमुख उपस्थित होते.

  हे सरकार केवळ पोलिसांच्या आणि गुंडांच्या सहाय्याने चाललंय

  पाटील म्हणाले, शहर जिल्हातील समस्या, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, महापूर मदत या व अन्य विषयांवर कार्यकर्त्यांनी सरकारवर तुटून पडावे. हे सरकार केवळ आणि केवळ पोलिसांच्या आणि गुंडांच्या सहाय्याने चालले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कायदेशीर माहिती घेऊन लढा द्यावा. त्यासाठी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाने वकिलांची फौज तयार ठेवावी. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून गेल्या 22 महिन्यात प्रदेश भाजपने या सरकारला एकही केस जिंकू दिली नाही.

  नोटीसा आल्या तर प्रति नोटिसा द्या

  पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी शासन, प्रशासनाच्या केसेसना घाबरू नये. कार्यकर्त्यांनी मनोबल वाढवले पाहिजे. आक्रमक झाले पाहिजे. ‘अ‍ॅटॅक इज द बेस्ट डिफेन्स’नुसार कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हावे. अंगावर गेल्याशिवाय काहीही होणार नाही. नोटीसा आल्या तर प्रति नोटिसा द्या. तक्रारी दाखल करा. वकिलांमार्फत बचाव करण्यास पक्ष कोठेही कमी पडणार नाही.
  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव आणल्याची क्‍लिप सर्वत्र व्हायरल झाली आहे. परब यांच्याविरोधात याचिका दाखल करणार आहोत. या सरकारमधील अनेकजण घाबरले आहेत. कोणकोण घाबरले आहेत याची नावे मी जाहीरपणे सांगत नाही. पण ते संबंधितांच्या लक्षात आलेले आहे, असा सूचक इशाराही पाटील यांनी दिला.

  चुकीच्या सल्ल्याने सरकारला मार खावा लागतोय

  राज्यात आघाडी सरकारमधील तीन पक्षांची शेवटची फडफड सुरू आहे. विरोधकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांच्या कारखान्याना मदत करायची नाही. कार्यकर्त्यांवर केसेस टाकायचे असे प्रकार करत आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे प्रकरणावरून सरकारची वागणूक सर्व जनतेला कळाली आहे. सल्लागाराच्या चुकीच्या सल्ल्याने सरकारला प्रत्येक बाबतीत मार खावा लागत आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

  मुख्यमंत्री ठाकरेंना 75 लाख पत्रे पाठवणार

  पाटील म्हणाले, स्वातंत्र्यांची 75 वर्षे झाली हे माहिती नाही, तर मग कशाला मुख्यमंत्री पदावर राहता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मागे वळून प्रधान सचिव कुंटे यांना स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे विचारावे लागते आणि विचारल्यावर असे हसता की चेष्टा केली आहे. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांची चेष्टा करणार्‍या ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी भाजप युवा मोर्चातर्फे उध्दव ठाकरे यांना 75 लाख पत्रे पाठवत आहोत.

  पार्टी ही पार्टी कार्यालयातून चालली पाहिजे. त्याअर्थाने भाजपचे सांगली जिल्हा कार्यालय हे जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करणारे केंद्र झाले पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या आपुलकीचे केंद्र बनले पाहिजे. ऑनलाईन यंत्रणेचा वापर करून जनतेचे प्रश्‍न सोडवा. त्यांच्या संपर्कात रहा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

  भाजप तुटेल असं आघाडी सरकारमधील पक्षांना वाटतं 

  चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात सत्ताबदल होऊन 22 महिने झाले. सत्ता नसल्याने भाजप तुटेल, कोणीतरी फुटेल असे आघाडी सरकारमधील पक्षांना वाटत आहे. पण त्यांच्या हाताला कोणीही लागले नाही. जिल्ह्यातील भाजपचे नेते विलासराव जगताप व शिवाजीराव नाईक यांचे मनापासून कौतुक आहे. सत्ता जाऊन 22 महिने झाले. तरिही मानसिकता टिकवून ठेवत जनेतेचे प्रश्‍न सोडवत आहेत.

  पृथ्वीराज देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यात भाजपला कोणी धक्के मारण्याचा नाहक प्रयत्न करू नये. जिल्ह्यात भाजप भक्कम आहे. जिल्ह्यात भाजपला निवडणुका लढवण्यासाठी कोणाच्या कुबडीची गरज नाही. येणारी निवडणूक ताकदीने लढवू. आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व नेत्यांना विरोधकांशी दोन हात करावे लागतील.