पोलिसांची सर्तकता कामी; तीन लाखांची रोकड मिळाली परत

    सांगली : येथील कॉलेज कॉर्नर परिसरात खाद्यपदार्थाच्या गाड्यासमोर पडलेली तीन लाखांची रोकड विश्रामबाग पोलिसांच्या सर्तकतेमुळे मिळाली. पैसे नेणाऱ्या महिलेचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेऊन ही कामगिरी केली. ही रक्कम संबंधित व्यक्तीस लवकरच दिली जाणार असल्याची माहिती निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.

    पतसंस्थेतील एका कर्मचाऱ्याने शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून तीन लाख १० हजारांची रोकड काढली. ती एका पिशवीत भरून ते निघाले होते. त्यावेळी कॉलेज कॉर्नर परिसरातील एका वडापावच्या गाड्यावर ते नाष्टा करण्यासाठी थांबले. त्यावेळी पैशांची पिशवी त्याठिकाणी पडली. पुन्हा ते घरी निघून आले. त्यानंतर गाडीत रोकड दिसून आली नाही. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने तत्काळ विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले. तीन लाखांची रोकड चोरीला गेल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी फिर्याद दाखल करण्यापूर्वीच मिळालेल्या माहितीनुसार तत्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना पाठवले.

    सीसीटीव्हीची तपासणी

    कॉलेज कॉर्नर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यावेळी त्या व्यक्तीची पैशांची पिशवी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळानंतर छत्री घेऊन निघालेली एक महिलेने ती पिशवी उचल्याचे दिसून आले. संबंधित महिलेची पोलिसांनी तत्काळ माहिती काढली. घरी जाऊन चौकशी केली असता तीन लाख १० हजारांची रोकड मिळून आली. दरम्यान, ही रोकड लवकरच संबंधित व्यक्तीस परत केली जाणार आहे. पोलिसांच्या सर्तकतेमुळे ही रक्कम मिळाली. विश्रामबाग पोलिसांच्या कामगिरीचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कौतुक केले.