प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

  सांगली : गेल्या दोन वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापूराचा फटका बसत आहे. यंदाही पश्चिम घाटातील कृष्णा खोऱ्यात मान्सूनपूर्वीच सुमारे २०.५३ टक्के इतका पाणी साठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी या जिल्ह्यांवर महापूराचे सावट आहे.

  पाणीसाठा त्या तुलनेत मुबलक असल्याने प्रशासनाने यंदा मान्सूनपूर्वीच महापुराची तयारी सुरू केली आहे. तरी देखील वेळेआधी दाखल झालेला मान्सून आणि हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला सुमारे १०४ टक्के पावसाचा अंदाज, ही परिस्थिती पाहता कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणासारखी मोठी धरणे जुलै अखेर पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज आहे.

  धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत सर्वसाधारणपणे तीनशे मिलीमीटर पाऊस पडून जमिनीत पाणी मुरल्यानंतर ओढे-नाले वाहू लागतात. ते धरणांच्या जलाशयात समाविष्ट होऊ लागल्यानंतर धरणांतील साठा वाढू लागतो. यंदा प्रथमच मेमध्ये ठिकठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाले. सुरुवातीच्या काळातच दमदार पाऊस सुरू झाल्याने या महिनाअखेरीसच धरणांतील साठा वाढू लागेल. कृष्णा खोर्‍याच्या धरण क्षेत्रात दरवर्षी जुलैला पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे धरणे लवकर भरल्यास नद्यांमध्ये पाणी सोडण्यास प्रारंभ होईल.

  कृष्णा उपखोर्‍यातील सर्वांत मोठ्या कोयना धरणात २२.८ टीएमसी साठा आहे. कण्हेर वगळता सर्व मोठ्या धरणांत २५ टक्क्यांपेक्षा अधिक साठा आहे. उरमोडी, तारळी, तुळशी ही धरणे आताच ५० टक्के भरली आहेत. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीप्रमाणेच धरणे लवकर भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार आहे.

  जलसंपदामंत्र्यांकडून सतर्क राहण्याच्या सूचना

  महापुराचा अंदाज आल्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तीनही जिल्ह्यात मे महिना अखेरीसच पाठबंधारे विभागाला तसेच स्थानिक महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर प्रशासनाबरोबरच स्थानिक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनाही बोट व पूरपरिस्थिती प्रात्यक्षिके देण्यात आली आहेत.

  धरणातील पाणी साठा

  धरण ……क्षमता( टीएमसी)…..साठा ( टीएमसी)
  कोयना……१०५.२५…………….२८.२
  वारणा..……३४.४०………………१३.७५
  धोम………१३.५०…………….५.०३
  कन्हेर…….१०.१०……………..२.२
  दुधगंगा……२५.४०…………….७.७५
  राधानगरी….८.३६……..……….२.६३

  धरणांमधून सोडला जाणारा विसर्ग

  विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. धोम ५७३, कण्हेर २४, दुधगंगा १००, राधानगरी ४००, कासारी २५०, पाटगांव २००, तारळी २०० व अलमट्टी धरणातून २२४४ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

  विविध पुलाच्या पाण्याची पातळी (इशारा पातळी/ फूट) कृष्णा पूल कराड २२.१ (४५), आयर्विन पूल सांगली १०.६ (४०) व अंकली पूल हरिपूर ७.३ (४५.११).

  प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण 

  प्रत्येक धरणात किती तारखेला किती पाणी जमा ठेवायचे ते निश्चित केलेले असते. त्यासाठी त्या धरणात गेल्या ३० वर्षांत त्या-त्या दिवशी किती पाणी आले, त्याचा अभ्यास केलेला असतो. त्यानुसार धरणांतून पाणी सोडण्याचे ठरविले जाते. प्रशासनाकडून सर्व ती तयारी झालेली आहे. पूरनियंत्रण कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे, असे सांगली पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद नाईक यांनी सांगितले.