राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी: पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

सर्वांना प्रतिक्षा असलेल्या मान्सून केरळमध्ये होताच राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी प्रामुख्याने, पश्चिम महाराष्ट्रासह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर पुढचे दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर सांगलीमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली.

    सांगली : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या मान्सून केरळमध्ये होताच राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी प्रामुख्याने, पश्चिम महाराष्ट्रासह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर पुढचे दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर सांगलीमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली. मिरजमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीही साचले होते. मराठवाड्यातही काही भागांत पाऊस झाला. मात्र मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते.

    भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

    मुसळधार पावसाने गडहिंग्लज तालुक्यात तिघांचा बळी घेतला. गडहिंग्लज तालुक्यातील मौजे मुगळी येथे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तीन जण ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार नांगणूर येथील अजित अर्जुन कांबळे (48) त्यांची बहिण गिरीजा व त्यांच्या दुसऱ्या भावाची पत्नी संगीता बसाप्पा कांबळे (45) हे तिघेही गिरीजा हिच्या सासूला पाहण्यासाठी हरळी येथे गेले होते. दरम्यान, हे तिघेही गावी परतत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी त्यांनी मुगळीपासून जवळ असलेल्या भीमा शंकर माने यांच्या पोल्ट्रीजवळ आसरा घेतला. यावेळी सुरू झालेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे भिंत कोसळून तिघेही गाडले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.