विकासाच्या नावाखाली सुरु असलेला पर्यावरणाचा विध्वंस रोखा : मेधा पाटकर

    सांगली : सध्या सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली सुरू असलेला पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्त्या, नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी केले.

    येथील सत्यशोधक प्रबोधिनीच्या वतीने आणि पर्यावरण प्रबोधिनीच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘डिजिटल सत्यशोधक संवाद’ या विशेष ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. ‘पर्यावरणपूरक विकास निती’ या विषयावरील आपल्या साक्षेपी मांडणीमध्ये त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. त्या पुढे म्हणाल्या, सत्ताधीश नैसर्गिक संसाधनांशी सामाजिक आणि आर्थिकरित्या खेळ करत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने निसर्गाचा रास केला जात आहे, याचे परिणाम देशातील सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत.

    कार्यक्रमास जलनायक भाई संपतराव पवार, डॉ. रवींद्र श्रावस्ती, ऍड. संदेश पवार, साथी विकास मगदूम यांच्यासह सत्यशोधक प्रबोधिनीचे दिगंबर माळी, स्वप्नील पाटील, वरद नागठाणे, रोहित माळी, नसीम गवंडी, सना पटेल, चैताली गुरव, सौरभ डांगे, अलंकार जाधव, सुरज बरगाले, पत्रकार प्रसाद माळी, आसिम पठाण, वैभव आटुगडे, अभिषेक ढाले, अभिषेक जवंदाळ, कुणाल काळोखे यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.