प्रा. तौहीद मुजावर यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

    सांगली : एएमपी या आंतरराष्ट्रीय संघटनेने ‘इंडियाज् टॉप इंडिव्हिज्युअल चेंज मेकर्स’ श्रेणीमध्ये ‘सोशल एक्सलन्स २०२१’ चा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात करियर कौन्सिलर, प्लेसमेंट ऑफिसर व प्रेरक वक्ता प्रा. तौहीद इब्राहिम मुजावर यांना प्रदान केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व इंजिनियरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना व संस्थांना कॉर्पोरेट आवश्यकतानुसार जगार कौशल्ये विकसित होण्यासाठी मार्गदर्शन करणारे म्हणून मुजावर यांची ख्याती आहे.

    पंतप्रधानांचे माजी तंत्रज्ञान सल्लागार सॅम पीत्रोदा, खासदार मनोज कुमार झा, ‘ऑल इंडिया मुस्लीम मजलिस-ए-मुशवरत’चे अध्यक्ष नवैद हमीद, ‘इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया’चे प्रमुख मौलाना खालिद रशीद फरंगी महली, असोसिएशन ऑफ मुस्लीम प्रोफेशनल्सचे अध्यक्ष आमिर एड्रेसी, समीक्षक फारूक सिद्दीकी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ कार्यक्रम मेगा ऑनलाईन माध्यमातून झाला.

    देशभरातून २२०० हून अधिक संस्था आणि वैयक्तिक अर्ज या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी आले होते. सांगलीच्या प्रा. तौहीद इब्राहिम मुजावर यांनी पुन्हा एकदा सांगली व महाराष्ट्राचे नाव देशभरात उंचावले. आपल्या कामातून लहान वयात आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कामाच्या जोरावर या पुरस्कारासाठी ते नामांकित झाले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट आवश्यकतानुसार रोजगार कौशल्ये विकसित होण्यासाठी त्यांचे प्रयत्न हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व इंजिनियरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना व संस्थांना परिचित आहेत.

    विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन, मार्गदर्शन, ट्रेनिंग आणि सर्वोत्तम कंपन्यांमध्ये प्लेसमेंट यासाठी गौरविण्यात आलेले प्रा. मुजावर विविध नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.