पीव्हीपीआयटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स कोर्सला मान्यता : अमित पाटील

    सांगली : बुधगाव येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पीव्हीपीआयटी) येथे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ए.आय.सी.टी.टी.ई. नवी दिल्ली यांनी नवीन कोर्सेसना मान्यता दिली आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स या कोर्सचा समावेश आहे.

    नोकऱ्यांच्या स्वरूपामध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्वात जास्त आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांना या विषयाचे ज्ञान मिळविणे क्रमप्राप्त ठरले आहे. ही गरज ओळखून विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करून नविन विद्याशाखा संस्थेमध्ये सुरू केली आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विद्याशाखेचे भविष्यामध्ये निर्माण होणारे बदल ओळखून त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स असा बदल करण्यात आला आहे.

    सध्या जगभरात उपयोगात येत असलेल्या आयओटी व्हर्म्युअल रिऍलिटी इंटेलिजन्ट रोबोटिक्स, थ्रीडी प्रींटिंग, ब्लॉकचेन, रिमोट सेन्सिंग व कम्युनिकेशन या तंत्रज्ञानाची कास धरून नवनवीन बदल करण्यात येत आहेत. पीव्हीपीआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयाची बी. टेक टेक (ऑनर्स), बी.टेक. (मेजर व मायनर ) पदवी मिळण्याची सोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने केली आहे.

    बी.टेक (मेजर व मायनर ) मध्ये विद्यार्थ्याला प्रवेश घेतलेल्या शाखेतून मेजर डिग्री व इतर आवडीच्या विद्याशाखेतून मायनर डिग्री घेता येते. यासाठी संस्थेचे विश्वस्त अमित पाटील, गर्व्हनिंग कौन्सिलचे अध्यक्ष पी. एल. रजपूत, संस्थेचे सचिव आदिनाथ मगदूम यांनी विशेष प्रयत्न केले.