Return rains hit Sangli district, causing severe damage to crops

जत तालुक्यात दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. जतमधून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे या भागातील अनेक घरांत आणि दुकानांत पाणी शिरले. जतमधील वेबनूर गावात वीज अंगावर कोसळल्याने जनावरे चारण्यासाठी गेलेल्या बाजीराव शिंदे (वय ६०) यांचा मृत्यू झाला. वाळवा आणि शिराळा तालुक्यात दुपारपासूनच पावसाला सुरूवात झाली.

सांगली : परतीच्या पावसाने सांगली (Sangali) जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी झोडपून काढले. रविवारी झालेल्या पावसाने (Heavy Rain) काढणीला आलेल्या पिकाचे (Losses Of Crops) मोठे नुकसान झाले. तर नद्या आणि ओढ्यांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन ठप्प झाले.

सांगलीत संध्याकाळी साधारण दीड तास मुसळधार पाऊस (Heavy Rain in sangali) कोसळला. यामुळं शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. सांगलीतील शहरी भागांसह आटपाडी, जत, कडेगाव आणि शिराळा या तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला. खानापूर तालुक्यात सलग ६ तास पाऊस कोसळल्यामुळे अग्रणी नदीला पूर आला. त्यामुळे विट्याकडून बेणापूर आणि भाळवणीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्यातील अग्रणी नदीला पूर आल्यामुळे करंजे येथील संपूर्ण पूल पाण्याखाली गेला. या पुरामुळे तासगाव रस्त्याला अक्षरशः नदीचे रूप आले होते.

जत तालुक्यात दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. जतमधून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे या भागातील अनेक घरांत आणि दुकानांत पाणी शिरले. जतमधील वेबनूर गावात वीज अंगावर कोसळल्याने जनावरे चारण्यासाठी गेलेल्या बाजीराव शिंदे (वय ६०) यांचा मृत्यू झाला. वाळवा आणि शिराळा तालुक्यात दुपारपासूनच पावसाला सुरूवात झाली. तालुक्यातील नदीनाले दुथडी भरून वाहत होते. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेत तीन व्यक्ती वाहून गेल्या.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शेतीला या पावसाचा फटका बसला आहे. अडसाली लागवण केलेल्या ऊसाची पिके भुईसपाट झाली आहेत. त्याचप्रमाणे काढणीला आलेल्या भात, भुईमूग आणि सोयाबीन या पिकांनाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील द्राक्षे आणि डाळिंबाच्या बागांचेही या पावसाने नुकसान झाले आहे. अनेक भागातील शेतशिवारात पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.