सांगली महापालिकेकडून २५ आशा वर्करवर ‘ड्रायरन’ संपन्न

३ ते ५ मिनिटात एका व्यक्तीचे होणार लसीकरण आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाची वैद्यकीय टीम सज्ज

सांगली : सांगलीत महापालिकेकडून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली . हनुमाननगर येथील आरोग्य केंद्रात ही रंगीत तालीम होणार असून २५ जणांवर कोविड लसीकरण कसे करायचे याची ट्रायल घेण्यात आली.

मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत महापालिका आरोग्य विभागाकडून या ड्रायरनचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण प्रक्रियेसाठी एकूण चार विभागामार्फत काम पाहिले जाणार आहे. यामध्ये पहिल्यांदा नोंदणी आणि तपासणी त्यानंतर शासनाच्या ऍपवर ऑनलाईन नोंदणी करावी लागते. यानंतर प्रत्यक्ष लसीकरण आणि त्यानंतर ३० मिनिटांची विश्रांती अशी सोय आरोग्य केंद्रात केली आहे. याचबरोबर जर कोणाला लसीकरण झाल्यानंतर काही रिएक्शन आली तर त्यांना तात्काळ उपचाराची सोय सुद्धा करण्यात येणार आहे. या ड्रायरनसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हीलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत खरनारे , महापालिकेचे वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे , वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव पाटील, डॉ वर्षा धनवडे, डॉ अक्षय पाटील, समर पवार , माधुरी पाटील, मनोज पवार, यांच्यासह आशा वर्कर आणि वैद्यकीय कर्मचारी यात सहभागी झाले आहेत.