सांगली मनपाने आशा कर्मचाऱ्यांचा कोविड भत्ता थकवला; गटप्रवर्तक संघटनेचा आंदोलनाचा इशारा

    सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेअंतर्गत काम करणाऱ्या २०० आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना अनुक्रमे ५ हजार, १० हजार कोविड कालावधीत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, असा ठराव महासभेत मंजुर करण्यात आला आहे ; परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. या ठरावाची अंमलबजावणी तातडीने करावी. या मागणीसाठी १५ जुन रोजी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    याबाबतची माहिती लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रातील आशा वर्कर्स महाराष्ट्र शासनानेदेखील भत्त्यात वाढ करावी म्हणून संपावर जाणार आहेत.

    महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका कोविडकालावधीत आशा व गटप्रवर्तकांना प्रोत्साहन भत्ता देतात. त्याच धर्तीवर प्रोत्साहन भत्ता सांगली महापालिकेने द्यावा, अशी मागणी गेल्यावर्षी पासुन संघटनेने केली होती. कोविड सुरु झाल्यापासून आशा वर्कर्सना फक्त कोविडचेच काम करावे लागते. ज्या कामासाठी त्यांना भत्ता मिळतो, ती कामे होत नाहीत. त्यामुळे त्यांना भत्ताच मिळत नाही. यासाठी कोविडसाठीचा वेगळा भत्ता देण्याची मागणी होती.

    आशा वर्कर स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करतायत पण वेगवेगळ्या कारणाने महापालिका भत्ता देण्याबाबत चालढकल करताना दिसते आहे. त्यामुळे मंगळवार १५ जून रोजी आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात महानगरपालीका क्षेत्रातील सर्व आशा वर्कर्स नी सहभागी होण्याचे अवाहन करीत असल्याचे संघटनेचे उमेश देशमुख यांनी केले आहे. प्रसिद्धीपत्रकावर वर्षा ढोबळे, विमल जाधव, सुषमा आमरल, प्रतिक्षा कांबळे, जास्मिन शेख आदींच्या सह्या आहेत.