अखेर सांगली महापालिकेला मिळाला विरोधीपक्ष नेता; संजय मेंढे यांची निवड

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय मेंढे (Sanjay Mendhe) यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मेंढे यांच्या निवडीचे पत्र महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याकडे दिले.

    सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय मेंढे (Sanjay Mendhe) यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मेंढे यांच्या निवडीचे पत्र महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याकडे दिले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष नेते पदासाठी सुरू असणारी रस्सीखेच अखेर थांबली आहे.

    उत्तम साखळकर यांनी महापालिकेच्या विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या जागी कोणाला संधी द्यायची याबाबत काँग्रेसच्या सर्व स्थानिक नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती. याबाबत बैठकांचे सत्र सुरूच होते. या पदासाठी संजय मेंढे, बहिदा नायकवडी आणि मंगेश चव्हाण, अभिजीत भोसले हे इच्छुक होते. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून विचारपूर्वक ही निवड करण्याचे आव्हान होते. संजय मेंढे आणि मंगेश चव्हाण यांच्यात रविवारपर्यंत चुरस होती. मात्र, सोमवारी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी महापालिकेत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते म्हणून संजय मेंढे यांच्या नावाचे अधिकृत पत्र सुपूर्त केले.

    यांनंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी संजय मेंढे यांचा सत्कार केला. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, मावळते विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक अभिजित भोसले, फिरोज पठाण, संतोष पाटील, प्रकाश मूळके, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.

    मदन पाटील गटाला पुन्हा संधी

    विरोधीपक्षनेतेपद हे आपल्याच गटाकडे मिळावे यासाठी काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांचे मोठे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. यासाठी सर्वच नेत्यांकडून एकत्रित बैठकीबाबत नगरसेवकांशी बातचीत करून निर्णय घेणेची ग्वाही दिली होती. सोमवारी मदन पाटील गटाचे नगरसेवक शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यासमवेत सकाळी १० वाजताच महापालिकेत आले आणि त्यांनी महापौरांची भेट घेऊन संजय मेंढे यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र दिले. यामुळे पुन्हा एकदा मदन भाऊ गटाला संधी दिली असल्याचे स्पष्ट झाले.