सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची दिसली चक्क मँचेस्टरमध्ये…

'आमचा मंडप व्यवसाय असल्याने आमच्या ग्राहकांना बसण्यासाठी लोखंडी खुर्च्या होत्या. पण कालांतराने ग्राहक प्लास्टिक खुर्च्या पसंद करत असल्यामुळे आम्ही त्या खुर्च्या भंगारात 10 रुपये किलोने कवठेमंकाळ येथे विकल्या होत्या. त्यानंतर मात्र त्या खुर्च्या तिकडे कशा गेल्या याचं मलाही कौतुक वाटते'. 

    तासगाव / संकेत पाटील : सध्या सोशल मीडियामध्ये सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळजमधील बाळू लोखंडे यांची चर्चा सुरू आहे. मात्र, ही चर्चा काही राजकीय किंवा सामाजिक नाही. तर ती चर्चा आहे चक्क एका लोखंडी खुर्चीची. हो…विश्वास नाही ना बसत ? पण हे खरं आहे.

    इंग्लंडमधील मॅंचेस्टर या भागातील एका रेस्टॉरंटबाहेर ही खुर्ची प्रसिद्ध क्रीडा समालोचक सुनंदन लेले यांना दिसली. लेले यांनी तात्काळ याबाबत आपल्या स्वतःच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुनंदन लेले हे मॅंचेस्टरमधील अल्ट्रीमबंकम या भागात फिरत असताना ही खुर्ची पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं देखील सुनंदन लेले सांगत आहेत.

    या खुर्चीच्या मागे बाळू लोखंडे, सावळज असं देवनागरी लिपीत लिहिल्याचं देखील दिसत आहे. याबाबत आम्ही बाळू लोखंडे यांना विचारला असता बाळू लोखंडे असे म्हणाले की, ‘आमचा मंडप व्यवसाय असल्याने आमच्या ग्राहकांना बसण्यासाठी लोखंडी खुर्च्या होत्या. पण कालांतराने ग्राहक प्लास्टिक खुर्च्या पसंद करत असल्यामुळे आम्ही त्या खुर्च्या भंगारात 10 रुपये किलोने कवठेमंकाळ येथे विकल्या होत्या. त्यानंतर मात्र त्या खुर्च्या तिकडे कशा गेल्या याचं मलाही कौतुक वाटते’.

    सुनंदन लेले यांचा लंडनमधून बाळू लोखंडे यांना फोन

    बाळू लोखंडे यांची खुर्ची लंडनमध्ये पाहिल्यानंतर सुनंदन लेले यांनी थेट इंग्लंडच्या मॅंचेस्टरमधून लोखंडे यांना फोन केला. इंग्लंडमध्ये मराठी माणसाचं नाव पाहून मी भारावून गेलो, असे देखील ते म्हणाले. त्याचबरोबर लंडनहून भारतात मी आल्यानंतर आपली भेट घ्यायला सावळजला येणार असल्याचे सुनंदन लेले यांनी लोखंडे यांना सांगितलं.