सांगली जिल्ह्यात शाळांची घंटा वाजणार; दीड वर्षांनी भरणार वर्ग

    सांगली : जिल्ह्यात गेल्या १६ मार्चला बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू (School Reopen) करण्याबाबतचे आदेश अखेर आज जारी झाले. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी आज ‘पहिलीपासून पुढचे वर्ग पालकांच्या संमतीने सुरू करा’, असे आदेश दिले. त्याचे शिक्षक संघटना, पालक, विद्यार्थी सान्यांनीच स्वागत केले आहे. तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजणार आहे.

    कोरोना संकटाचा मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडण्यापूर्वी १५ मार्चला  जिल्ह्यात शाळा बंद करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. तेव्हापासून शाळा बंदच आहेत. काही दिवस वरचे वर्ग सुरू झाले, मात्र ते फार काळ चालू शकले नाहीत. राज्य शासनाने अनेकदा शाळा सुरू करण्याचे सुतोवाच केले. मात्र दुसरी लाट आडवी

    आली आणि निर्णय झालेच नाहीत. आता जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची रोजची आकडेवारी तीनशेपर्यंत खाली आली आहे. या स्थितीत अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ यांनी केली होती. त्यासाठी शिक्षण विभागावर दबावही होता. किमान दहावीचे वर्ग भरवा, यासाठी पालक आक्रमक झाले होते. त्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती बैठक चर्चा झाली. पालक, शाळा समितीचे संमती असेल तर वर्ग भरवा, असे ठरले. त्यानुसार आज शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले.

    आधी ठराव, मग शाळा

    शाळा व्यवस्थापन समितीने आधी बैठक घ्यायची आहे. त्यात शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव होईल. पालकांकडून त्यांना शाळा सुरू करण्यात हरकत नाही आणि ते आपल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत, असे संमतीपत्र घेतले जाईल. आता शाळा सुरू करण्यात अडचण नाही, वर्ग भरवावेत, कोरोनाची पूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी केले.