धक्कदायक! इस्लामपूरमध्ये मृतदेहावर केले तब्बल दोन दिवस उपचार; डॉक्टरला अटक

आरोपी डॉ. वाठारकरचे शहरातील बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा ( वय ६०) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअर मध्ये दाखल केले होते. त्या महिला रुग्णावर डॉ. योगेश वाठारकरने उपचार केले. रुग्ण सायरा यांचा उपचारादरम्यान ८ मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला.

    सांगली : मृत रुग्ण जीवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार इस्लामपुर ता. वाळवा येथे उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. डॉ. वाठारकर याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून अटक केल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कासेगाव येथील आचारी काम करणाऱ्या सलीम हमीद शेख यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती.

    याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार,  आरोपी डॉ. वाठारकरचे शहरातील बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा ( वय ६०) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअर मध्ये दाखल केले होते. त्या महिला रुग्णावर डॉ. योगेश वाठारकरने उपचार केले. रुग्ण सायरा यांचा उपचारादरम्यान ८ मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले. दोन दिवसांनी डॉ. वाठारकर यांनी नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली. वास्तविक आईच्या उपचराबाबत दोन दिवस माहिती न दिल्याने शंका आली होती. सलीम यांना 10 मार्च पर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून ४१ हजार २८९ इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.सायरा शेख यांचा आधार हेल्थ केअर मध्ये उपचारादरम्यान ८ मार्चला मृत्यू झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे. मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदीवरून मृत्यू आठ मार्चला झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, डॉक्टरांनी मृतदेह १० मार्चला ताब्यात दिला. यामुळे नेमके काय? ही परिस्थिती नातेवाईकांनी जाणून घेत डॉक्टर विरोधात तक्रार केली आणि याप्रकरणी पाठपुरावा केला. सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करत मृतदेहाची विटंबना केल्याचे अखेर बिंग फुटले. अन् डॉ. वाठारकर अलगद फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला.दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली. त्याच्यावर भा.दं.वि.कलम ४०६, ४२०, ४६४, २९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तपास करीत आहेत.