सांगलीच्या श्री गणपती पंचायत ट्रस्टच्या सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना आज साध्या पद्धतीने

    सांगली : सांगलीच्या श्री गणपती पंचायत ट्रस्टच्या सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना आज साध्या पद्धतीने करण्यात आली. कोणताही शाही लवाजमा न घेता श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते श्रींची पूजा करून सरकारी उत्सवाला सुरवात झाली. राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये पारंपारिक सरकारी गणपती विराजमान करण्यात आला.

    गणपती पंचायत संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी पाच दिवस सरकारी उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते पाचव्या दिवशीच्या विसर्जनापर्यंत शाही वातावरण असते. मात्र, कोरोना आणि महापूर यामुळे यंदाचा सांगली संस्थानचा गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. कोणताही शाही डामडोल न करता सरकारची गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि संपूर्ण पटवर्धन परिवाराकडून विधिवत पूजा करून उत्सवाला सुरवात झाली.

    यावेळी गणपती संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी गणरायाचरणी प्रार्थना संपूर्ण पटवर्धन परिवाराने केली.

    …तर पाच दिवस साध्या पद्धतीनेच उत्सव

    पाच दिवस साध्या पद्धतीनेच उत्सव साजरा केला जाईल आणि सांगलीकर जनतेनेही कोरोना नियमांचे पालन करीत उत्सव साजरा करावा असे आवाहन संस्थानाकडून करण्यात आले आहे.