
सांगली : तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे द्राक्षबागेत असलेली घोणस जातीचा साप पकडत असताना त्याने चावा घेतल्याने सर्पमित्राचा मृत्यू झाला. संजय गणपती माळी (वय 56) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी चारच्या दरम्यान घडला. मात्र, दंश झाल्यानंतर भितीने बाजूचे लोक पळून गेल्याने त्यांना वेळेत उपचार झाले नाहीत त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
पंकज वसंत गवळी यांच्या शेतातील द्राक्षबागेत 2 घोणस जातीच्या सापांची जुळी जोड पंकज यांना दिसली. यावेळी पंकज यांनी तासगाव येथील सर्पमित्र संजय माळी यांना याबबत कळवले व येण्याची विनंती केली.
माळी हे आल्यावर त्यांनी पाहिले असता पाण्याच्या पाटात दोन्ही साप होते. त्यांनी लागलीच पकडण्यास सुरवात केली. एक घोणस त्यांनी शिताफीने पकडली. ती त्यांनी प्लास्टीकच्या डब्यात बंद करून ठेवली. तोवर दुसरी घोणस पळू लागली. माळी यांनी पाठलाग करून त्याची शेपटी पकडताच उजव्या हाताच्या बोटालाच त्याने दंश केला.
दंश होताच ते विव्हळत खाली पडले. तर घोणस पळून जाऊ लागली. मात्र, यावेळी हा प्रकार पाहात असलेली मंडळी भीतीने पळून गेली. तासगाव सावळज रस्त्यापासून शंभर मीटर आत अंतरावर हा सर्व प्रकार घडला.
रुग्णवाहिकेस फोन करून ती वेळेत आली नाही. या सर्व प्रकारास अर्धा तास लोटला. मात्र माळी यांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात न नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून साप पकडत होते. मानवी वस्तीतील शेकडो साप त्यांनी पकडून निर्मनुष्य ठिकाणी सोडण्याचे काम केले होते. मात्र अनेक सापांचा जीव वाचवणाऱ्या सर्पमित्राचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.