प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना संदर्भात आवश्यक काळजी घेत कमी पटाच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यात याव्यात.

    सांगली : कोरोना काळात जिल्ह्यातील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऑनलाईन सोबत प्रत्यक्ष शालेय वातावरणात अध्ययन अनुभव देणे महत्वाचे आहे. कोरोना संदर्भात आवश्यक काळजी घेत कमी पटाच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यात याव्यात. तसेच मोठ्या पटांच्या शाळा आवश्यक काळजी घेत टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. ही मागणी पत्राद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी, जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले उपस्थित होते.

    यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील बर्‍याच गावात पालकांकडून व शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होत आहे. शासन स्तरावरून प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत आदेश नाहीत. शासनाचे आदेश नाहीत व शाळा व्यवस्थापन समिती शाळा सुरू करण्याबाबत आग्रही आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात कशाप्रकारे कार्यवाही करावी याबाबत शिक्षकांच्या मनात संभ्रम आहे. प्रशासन देईल त्या सूचनेनुसार अमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक वर्ग तयार आहे. याबाबत प्रशासनाकडून मुख्याध्यापकांना नियमावली व परवानगी देण्यात यावी.

    गतिमान शिक्षण अभियान राबवा

    कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर झालेले परिणाम व भविष्यात जिल्ह्यातील विद्यार्थ्याचे या काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढत पुढील अभ्यासक्रम आत्मसात करण्यासाठी विद्यार्थी – शिक्षक – पालक यांच्या समन्वयातून कृती कार्यक्रम राबवण्याबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील तज्ञ शिक्षक,शिक्षण विभागातील अधिकारी,पालक प्रतिनिधी,शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी,लोकप्रतिनिधी, शिक्षणतज्ञ यांची समिती स्थापन करुन कृती कार्यक्रम निश्चित करुन “गतिमान शिक्षण अभियान” राबवण्यात यावे ही मागणीही यावेळी केली.