जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु करा; जुनी पेन्शन हक्क संघटनेची मागणी

    सांगली : जिल्हा परिषदेच्या (ZP School) शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे.

    प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा मार्च २०२० पासून बंद आहेत. या काळात जिल्ह्यातील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. परंतु, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईन अध्ययन अनुभव देणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्व सरकारी, खासगी कार्यालये व दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. प्रत्येकाने काळजी घेत कोरोना सोबत जगणे ही काळाची गरज आहे. कोरोना संदर्भात आवश्यक काळजी घेत जिल्ह्यातील कमी पटाच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यात याव्यात. तसेच मोठ्या पटांच्या शाळा आवश्यक काळजी घेत टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात यावे.

    त्यांनी पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यातील बऱ्याच गावात पालकांकडून व शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होत आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यास सर्व शिक्षक शाळा सुरू करण्यासाठी तयार आहेत. परंतु शासन स्तरावरून प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत आदेश नाहीत. शासनाचे आदेश नाहीत.

    शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात कशाप्रकारे कार्यवाही करावी याबाबत शिक्षकांच्या मनात संभ्रम आहे. शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात होणाऱ्या मागणीबाबत कशाप्रकारे कार्यवाही करावी, याबाबत प्रशासनाकडून मुख्याध्यापकांना नियमावली व परवानगी देण्यात यावी. यावेळी राहुल कोळी, नेताजी भोसले उपस्थित होते.