सांगली महापालिका विकास कामासाठी राज्य सरकारकडून निधी कमी पडू देणार नाही

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका 'ड' वर्गात असतानाही या महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत दिली.

 सांगली (Sangali) (शंकर देवकुळे).  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका ‘ड’ वर्गात असतानाही या महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत दिली. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत सांगली मिरज कुपवाड शहर महानगर पालिका सभागृहात विकास कामांचा आढावा व विकास नियंत्रण नियमावली सादरीकरण करण्यात आले. यावेळी नाम. शिंदे बोलत होते. बैठकीस महापौर गीताताई सुतार, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले की, सांगली महापालिका ड वर्ग महापालिका असतानाही अनेक योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या जातात आहेत. या महापालिकेचा विस्तार मोठा आहे मात्र त्या मानाने उत्पनाचे स्रोत कमी आहेत. त्यामुळे महापालिकेने उत्पनाचे स्रोत शोधावेत. राज्यसरकारकडून महापालिकेच्या प्रास्ताविक आणि प्रलंबित सर्वच योजनांना निधी दिला जाईल यात कोठेही सरकार कमी पडणार नाही. सांगलीची काळी खण, मिरज दर्गा याचा विकास आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेशही मंत्री शिंदे यांनी मनपा आयुक्त कापडणीस यांना दिले. याचबरोबर कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रस्तावही तातडीने पाठवा असेही त्यांनी सूचित केले.

शिंदे म्हणाले की, उपयोगकर्ता कर हा दोन वर्षांपूर्वी लागू झालेला आहे तो रद्द करता येणार नाही आणि या कराचा फायदा जनतेलाच होणार आहे मात्र या करामध्ये सवलीत देण्याबाबत नक्की विचार केला जाईल . याचबरोबर महापालिकेने काटकसरीने महापालिकेचे कामकाज करावे अशी सूचनाही त्यांनी केली. मिरज अमृत पाणी योजनेबद्दल मंत्री शिंदे यांनी मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि महापालिकेच्या टीमच्या कामकाजाचे कौतुक केले. तसेच पदाधिकारी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे असेही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचित केले. गुंठेवारी नियमितीकरणाचा शासनाने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत करीत यापुढे गुंठेवारी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले. सांगली मिरज रोड चौपदरीकरण झाला आहे आता तो सहापदरी करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यानी जिल्हा प्रशासनाला दिले.