jayant patil

पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी आता आणखी कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कोरोना साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांनी देखील सहकार्य करावे.

    सांगली: जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर अद्याप १० ते २० च्या दरम्यान आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी कडक करण्यात यावेत, याची कडक अंमलबजावणी करावी. याबाबत जिल्हाधिकारी लवकरच नवीन आदेश काढतील, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात सध्या दररोज १३ ते १४ हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. चाचणीच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर १० टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के इतका आहे. त्यामुळे नियमानुसार जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे.

    पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी आता आणखी कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कोरोना साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांनी देखील सहकार्य करावे. निर्बंध आणखी कडक केल्याशिवाय कोरोना संख्या कमी होणार नाही. त्यामुळे किराणा साहित्य आणि भाजीपाला घरपोच देण्याची सोय करण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी नियमावली जाहीर करून आदेश काढतील.

    रस्त्यावरील गर्दी तातडीने कमी होणे गरजेचे आहे. अनेक लग्नसमारंभामधून मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. ती गर्दी नियंत्रणात आणावी. ज्या गावांमध्ये लग्नसमारंभ आहे, त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्याला याबाबत माहिती कळवावी. खाद्यपदार्थाच्या गाड्यावरील गर्दीही नियंत्रित करावी. गर्दी होणाच्या वेळी पोलिसांनी प्रसंगी बळाचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर कमी होणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील सहकार्य करावे. निर्बंधामध्ये असलेले व्यवसाय बंदच ठेवावेत. व्यापाऱ्यांनी आंदोलन न करता सहकार्याची भूमिका घ्यावी.

    जयंत पाटील

    पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्यास पुन्हा सर्व व्यवहार सुरू करण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

    पोलिसांनी कडक ‘फिल्ड वर्क’ करावे

    जिल्ह्यात निर्बंध लागू करून देखील अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येते. सर्व नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थाांना केवळ पार्सल देण्यास परवानगी दिली असताना, त्या ठिकाणी देखील गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी पोलिसांना मोकळीक देण्यात आली आहे. गर्दी आढळून येणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी कठोर आणि कडक फिल्ड वर्क करावे, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत.