शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र हे विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनाचे यश : राजीव मोरे

    सांगली : तासगाव येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठातील कामांसाठी आता कोल्हापूरला जाण्याची गरज भासणार नाही. हे उपकेंद्र होण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता, तसेच सलग पाच वर्षे विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही यासाठी पाठपुरावा केला होता. आता हे उपकेंद्र अखेर होत आहे, हे विद्यार्थी काँग्रेसचे यश असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस राजीव मोरे यांनी व्यक्त केले.

    ते म्हणाले, २०१४ पासून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी मी विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असल्यापासून पाठपुरावा करीत आहे. यासाठी आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य विद्यार्थी मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, आमचे नेते आणि विद्यमान मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी देखील या मोर्चात सहभाग घेऊन मोर्चाला संबोधित केले होते.

    सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. हे उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल, उपकेंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणीही मोरे यांनी केली.