स्वाभिमानी शेतकरी संघटना आता वाहतुकदारांच्या प्रश्नांवर लढा उभारणार : महेश खराडे

साखर कारखान्यांनी वाहतुकीचे पैसे त्वरित दिले पाहिजेत, कमिशनसाठीही अडवणूक होता कामा नये, यासह अन्य मागण्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ऊस वाहतूकदारांच्या अनेक समस्या आहेत. मात्र, ते संघटित नाहीत, त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी येत्या गुरुवारी (दि. 30) सांगलीत पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे (Mahesh Kharade) व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बेले (Sanjay Bele) यांनी दिली.

    या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा गुरुवारी दुपारी बारा वाजता मार्केटयार्डातील सहकार भवन येथे होणार आहे. साखर कारखानदारीतील मुख्य घटक आहे. मात्र, हा घटक सध्या प्रचंड अस्वस्थ आहे. कारण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी मजूर कोट्यवधीचा गंडा घालत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षात तब्बल 200 वाहतूकदारांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे तोडणी मजुरांसाठी दिल्या जाणाऱ्या ऍडव्हान्सला विमा संरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी आहे.

    पोलीस व आरटीओकडून होणारी लूट थांबली पाहिजे, अलीकडच्या काळात ट्रॅफिक व ओव्हरलोडच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागतो, तो थांबला पाहिजे. ऊस वाहतूक महामंडळाची स्थापना केली पाहिजे, या महामंडळाकडे मजुराची नोंदणी झाली पाहिजे, नोंदणीकृत मजुरांचा पुरवठा साखर कारखान्यांना झाला पाहिजे, टोलमाफी मिळाली पाहिजे.

    साखर कारखान्यांनी वाहतुकीचे पैसे त्वरित दिले पाहिजेत, कमिशनसाठीही अडवणूक होता कामा नये, यासह अन्य मागण्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर आदी जिल्ह्यातून वाहतूकदार येणार आहेत. तरी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने वाहतूकदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खराडे आणि बेले यांनी केले.