उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करा; पालकमंत्री जयंत पाटलांनी दिले आदेश

कोरोना रुग्णाला उपचार नाकारणाऱ्या अथवा टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

    सांगली : कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णास रुग्णालयात बेड शिल्लक असतानाही दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णाला उपचार नाकारणाऱ्या अथवा टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

    पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात जवळपास साडेसहा ते सात हजार कोरोना स्वॅब टेस्टिंग करण्यात येत आहेत. पॉझिटिव्हिटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असून, तो सध्या 17.35 टक्क्यांवर आला आहे. होम आयसोलेशनमध्ये सुमारे 8 हजार 500, तर कम्युनिटी आयसोलेशनमध्ये 1 हजार 650 रुग्ण आहेत. सर्वांनी संसर्ग टाळण्यासाठी यापुढेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा. तसेचं सद्यस्थितीत जिह्यात एकूण 4 हजार 320 बेडसंख्या असून, यामध्ये 861 आयसीयूमधील बेड्सची, तर 3 हजार 459 ऑक्सिजनेटेड बेडची संख्या आहे. दरम्यान आयसीयू बेडची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने शासकीय इमारती वापरात आणाव्यात, त्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यासह सर्व उपचार यंत्रणा सज्ज ठेवावी. आयसीयूमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना प्रशिक्षण द्या. कोणत्याही स्थितीत रुग्ण दगावू देणार नाही, अशी जिद्द त्यांच्यात निर्माण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

    फळ, भाजीपाला व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल; पण कोरोना संसर्गाची ही वेळ अशी आहे की, सर्वांनीच यामध्ये संयमाने सहकार्य करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या निर्देशास अनुसरून जिल्ह्यातही निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी महानगरपालिकेने कम्युनिटी आयसोलेशनसाठी यंत्रणा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले.

    तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा आतापासूनच सुसज्ज ठेवा. या लाटेचा लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन उपचारासाठी लागणारी औषधे वेळेत खरेदी करून ठेवा. यासंदर्भात निर्माण करण्यात आलेल्या बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सच्या सूचनांनुसार सर्व कार्यवाही करा. अशा सूचनाही जयंत पाटलांनी दिल्या आहेत.

    सर्व वॉडॅमध्ये सीसीटीव्ही बसवा

    कोविड रुग्णांसंबंधीची सर्व माहिती पोर्टलवर अद्ययावत ठेवावी. सर्व वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत व ते पोर्टलला जोडण्यात यावेत. बेड इन्फॉर्मेशन सिस्टिम अधिक सक्षम करा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नादुरुस्त व्हेंटिलेटर्सबाबत आढावा घेऊन सदरचे व्हेंटिलेटर्स त्वरित दुरुस्त करून घ्या. जिल्ह्यात जे ऑक्सिजन प्लाण्ट उभारणी प्रक्रियेत आहेत, त्यांची कामे गतीने पूर्ण करून घ्या, असे निर्देशही त्यांनी दिले.