Terror in Sangli again; The leopard was captured on a trap camera

सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याती लवांगी गावच्या शिवारात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात बिबटा कैद झाला आहे. कॅमेऱ्यात या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

कडेगाव तालुक्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या असल्याचे अभयारण्यात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमे-यात दिसून आले आहे. अभयारण्यात हरण, काळवीट, वानर मोठ्या संख्येने असून ते बिबट्याचे प्रमुख अन्न असल्याने बिबट्या तळ ठोकून राहिला असल्याची चर्चा आहे.

अभयारण्यात असलेल्या बिबट्याने ताकारी पंपगृह टप्पा क्रमांक दोन जवळ प्रवाशांच्या नजरेस पडला आहे. बिबट्याने प्रवाशांच्यावर हल्ला करण्याचा ही प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. मात्र अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.  अभयारण्यातील बिबट्या अभयारण्यातून बाहेर पडून आसद, मोहिते वडगाव गावाच्या शिवारात पोहचला असल्याचा पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. एकंदरीत बिबट्या बाबत लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात भिती आहे.

वनविभागाने सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देवराष्ट्रे, आसद, मोहिते वडगाव आदी गावातील नागरिकांच्याकडून होत आहे. असे असताना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास वांगी गावच्या दक्षिणेस असणाऱ्या म्हसोबा ओढ्यावरील रस्त्यावर कुत्र्याच्या पाठिमागे धावणारा बिबट्या बबन चव्हाण (वांगी) यांना दिसला आहे.

बबन चव्हाण हे सोनहिरा साखर कारखान्यात कामगार आहेत. ते ड्यूटीवर जाताना त्यांनी बिबट्यास प्रत्यक्ष पाहिले आहे. सदरचा बिबट्या सकाळी म्हसोबा ओढ्यापासून पूर्वेकडे (गावानजिकचा चव्हाणमळा ) पळाला असल्याचे ते सांगत आहेत. वांगी गावच्या शिवारात बिबट्या दिसल्याची माहिती संपूर्ण गावात पसरल्याने खळखळ उडाली आहे. प्रत्येकजण बिबट्या बाबत चर्चा करताना दिसून येत आहे. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.