ठाकरे सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी केली : आशिष शेलार

  सांगली : नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : देश आणि राज्यातील आकड्यांची तुलना केली असता देशातील वीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून त्यामध्ये सक्रिय रुग्णांचा समावेश 23 टक्के आहे. देशातील मृत्यूंच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्युदर 30 टक्के आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकारला अपयश आले असून, या सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी करून टाकली असल्याची टीका भाजप नेते व माजी मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली.

  मिरजेतील एकाच अपेक्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाने 87 जणांचा मृत्यू होतो ही बाब गंभीर आहे. रुग्णालयाच्या परवानग्या बाबतची पद्धत पाहिली तर संपूर्ण दोष महानगरपालिकेच्या आयुक्तवर येतो. त्यामुळे ते पोलीस चौकशीत उघड होईलच. मात्र, या प्रकरणाची भाजपकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जाईल. प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही शेलार यांनी यावेळी दिला.

  जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या आढावा बैठकीनंतर माजी मंत्री शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीचा सामना करावा लागत आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासन साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असले तरी राज्यातील ठाकरे सरकारला कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आले आहे.

  महाराष्ट्र मध्ये कोरोना रुग्णांना सुविधा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न कोठेही दिसून आला नाही. वरुणाच्या पहिल्या लाटेमध्ये डॉक्टर आरोग्य सेविकांच्या पगार असा प्रश्न निर्माण झाला होता. तर दुसर्‍या लाटेमध्ये बेड मिळवण्यासाठी तसेच ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. देशातील एक लाख तीस हजार मृत्यूंपैकी महाराष्ट्रात 67 हजार 296 जणांचा मृत्यू झाले. शहरातील कोरोना ग्रामीण भागात पसरवण्त ठाकरे सरकार जबाबदार आहे.

  लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. मात्र दिलेल्या लसीचे योग्य नियोजन न केल्यामुळे परिणामी वेळेस पुरवठ्यावर झाला. लसीकरणात पहिला नंबर मिळाला की यश महाराष्ट्र सरकारचे, मात्र लसींचा पुरवठा कमी झाला तर त्याचा दोष मोदी सरकारला, असे काम राज्य सरकारचे सुरू आहे. केंद्र सरकार कडून संपूर्ण देशात मोफत लस पुरवली जात आहे. मात्र, केवळ राजकारण करायचे म्हणून मोदी सरकारला टीकेचे धनी करण्याचा ठाकरे सरकारचा उद्योग असल्याची टीका केली. सांगली जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती ही गंभीर आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी एकमेकांच्या हातात हात घालून एकत्रित काम केले पाहिजे, असे माजी मंत्री शेलार यांनी सांगितले.

  यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, गौतम पवार, नीता केळकर आदी उपस्थित होते.