इस्लामपुरात जिल्ह्यातील पहिले मोबाईल लसीकरण; पहिल्याच दिवशी १५४ जणांनी घेतली लस

अनेक वृद्धांना कोरोना लसीकरणासाठी घराबाहेर पडता येत नाही. काहींना तासन् तास लसीकरणाच्या गर्दीत जाणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी थेट त्यांच्या दारात जाऊन लसीकरण (Vaccination in Islampur) मोहीम राबविण्यात आली.

    वाळवा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अनेक वृद्धांना कोरोना लसीकरणासाठी घराबाहेर पडता येत नाही. काहींना तासन् तास लसीकरणाच्या गर्दीत जाणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी थेट त्यांच्या दारात जाऊन लसीकरण (Vaccination in Islampur) मोहीम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी १५४ जणांनी लस घेतली. यात ११२ जणांनी पहिला डोस तर ४२ जणांनी दुसरा डोस घेतला.

    इस्लामपूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जिल्ह्यातील पहिली मोबाईल लसीकरण मोहीम झाली. यात घराच्या दारात जावून नागरिकांना लसीकरण करण्यात आले. शहरातील शास्त्रीनगर, कोल्हापूर रस्ता परिसरामध्ये या मोहिमेचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. नरसिंह देशमुख, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अशोक शेंडे, डॉ. राहुल कुंडले, नगरसेवक संजय कोरे यांच्या हस्ते झाला.

    शहरातील पहिली मोबाईल लसीकरण मोहीम असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. उपजिल्हा रुग्णालयाचा नर्सिंग स्टाफ दीपाली पाटील, वनिता कांबळे, आशा स्वयंसेविका माया जाधव, दीपाली पाटील, दीपाली सुतार यांनी लसीकरण केले. शास्त्रीनगर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोहिमेला प्रतिसाद मिळण्यासाठी पुढाकार घेतला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती दिली. आरोग्य कर्मचारी संदेश सुतार, साजिद रोटीवाले यांनी संयोजन केले. नागरिकांचा या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    थेट घराच्या दारात कोरोना लस

    मोबाईलवरून नोंदणी करताना आरोग्य विभागाची साईट ओपन न करणे, गर्दीत जाणे शक्य नसल्याने अनेकांनी लस घेतली नव्हती. या मोहिमेमुळे अनेकांना थेट घराच्या दारात लस मिळाली.