कोयना धरणाचे दरवाजे चार फुटांनी उचलले; ४५ हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले

कोयना, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी, धरणात पाण्याची आवक वाढली आहे. चांदोली धरणातून ५ हजार ४८२ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आयर्विन पुलाजवळ सायंकाळी कृष्णेची पाणी पातळी ११ फूट होती.

    सांगली : कोयना धरणांतर्गत (Koyna Dam) विभागात सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे सोमवारी सायंकाळी पाच वाजता अडीच फुटावरून चार फूट नऊ इंच वर करण्यात आले. त्यातून प्रतिसेकंद ४५ हजार क्युसेक पूर्वेकडे नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

    कोयना, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी, धरणात पाण्याची आवक वाढली आहे. चांदोली धरणातून ५ हजार ४८२ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आयर्विन पुलाजवळ सायंकाळी कृष्णेची पाणी पातळी ११ फूट होती.

    १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आता धरणात केवळ थोडकेच पाणी सामावून घेतले जाऊ शकते. त्याचवेळी सध्या प्रतिसेकंद धरणात सरासरी २३,९१० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. यापुढे धरणातील पाण्याची आवक वाढली तर याहीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

    कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी दुपारपासून धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, सायंकाळी यात वाढ करून विसर्ग २३ हजार ७८० क्युसेक करण्यात आला. त्यानंतर सोमवारी सांयकाळी यामध्ये पुन्हा ४५ हजार क्यूसेक इतकी वाढ करण्यात आली आहे.

    धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. तसेच कर्नाटकातील अलमट्टीतून ४४ हजार ५०९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. कृष्णा, वारणा नद्यांची पाणी पातळी अचानक वाढून विद्युत पंप बुडण्याची शक्यता आहे.