अयोध्या राममंदिरातील रामाची मूर्ती मिशीवाली असावी : संभाजी भिडे

सांगली : सध्या अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाच्या कामाला वेग आला असून येत्या ५ ऑगस्ट रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत शिलान्यास करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठात हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रामाच्या मूर्तीबाबत एक मागणी केली आहे. या मंदिरात बसविण्यात येणाऱ्या प्रभू रामांच्या मूर्तीला मिशी असावी, अशी मागणी भिडे यांनी केली आहे. तसेच राम मंदिराचे भूमिपूजन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजनही  करण्यात यावं, असंदेखील संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. 

प्रभू राम, लक्ष्मण, हनुमान हे अतुलनीय, पूज्यनीय पुरुष दैवत होते. पण यांच्या मूर्ती,चित्रामध्ये राम-लक्ष्मणाला मिशा दिसत नाहीत . शिल्पकार व चित्रकाराकडून आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम दाखवले गेले.त्यामुळे आता होणाऱ्या  राम मंदिरात जी मूर्ती बसवली जाईल, ती मूर्ती मिशीवाली असावी  अशी मागणी  संभाजी भिडे  यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे.

शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भिडे गुरुजींचा सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भिडे गुरुजींनी अयोध्येला भूमिपूजनाला जाण्याबाबत सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे  व शरद पवार यांना जरी अयोध्या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण नसले तरी त्यांनी अयोध्येला गेले पाहिजे असे भिडे गुरुजी म्हणाले आहेत.