सावधान ! सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढतीये…

    सांगली/प्रवीण शिंदे : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह दर मागील आठवडयात ६.८९ टक्के होता. यामुळे जिल्हावासियांनी आपली पाठ थोपटून घेतली. जिल्हा प्रशासनानेही तत्परतेने तिसऱ्या टप्प्यात सांगलीचा समावेश केला. तसेच निर्बंध शिथिल केले. यामुळे सांगलीकरांचा बेजबाबदारपणा वाढला असल्याचे दिसत आहे. यंदाच्या आठवडयाचा पॉझिटिव्हीटी दर राज्य शासनाने जाहीर केला असून, तो १. २१ टक्कयांनी वाढलेला आहे. आता हा दर ८.१० टक्क्यांवर स्थिरावला आहे.

    जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या आत येण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. मृत्यूचे प्रमाणही तीसच्या आसपास स्थिर आहे. दुसरीकडे जून महिन्याच्या प्रारंभी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची तसेच ऑक्युपाईड म्हणजेच सध्या रुग्ण असलेल्या बेडची संख्या किती आहे. त्यावरून विविध शहरांची ५ गटांमध्ये विभागणी केली आहे. त्यानुसार दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार प्रत्येक जिल्हा प्रशासनाला स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन अनलॉकची व्याप्ती वाढविण्यास मुभा दिलेली आहे. ज्यावेळी शासनाने हा निर्णय घेतला त्या आठवड्यात सांगलीचा पॉझिटिव्हीटी दर १०.०९ टक्के होता. त्यानंतरच्या आठवड्यात ४ ते १० जून या कालावधीत ६.८९ टक्के झाला. मात्र, ११ ते १७ या कालावधीत तो पुन्हा वाढून ८.१० टक्के झाला आहे.

    राज्य शासनाच्या अहवालात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकूण किती कोरोना चाचण्या (आरटीपीसीआर आणि ॲन्टीजन) करण्यात आल्याची आकडेवारी देण्यात आहे. त्यानुसार जिल्ह्यात मागील आठवड्यात १ लाख ११ हजार ९७९ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ७ हजार ७२० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ११ ते १७ या कालावधीत १ लाख ८ हजार ३३ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ८ हजार ७५२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ही वाढ लहानशी दिसत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. जिल्ह्यातील ३०.९१ टक्के खाटा सध्या कोरोनाबाधितांकरिता वापरात असल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

    बेशिस्तांवर वचक हवा

    जिल्ह्यातील निर्बंध शिथिल झाल्यावर जणू काही कोरोना संपला अशा आविर्भावातच नागरिक वावरताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत कोरोना आचारसंहितेकडे दुर्लक्ष करुन गर्दी होत आहे. याचा परिणाम पॉझिटिव्हीटी दर वाढण्यात झाल आहे. जिल्हा प्रशासन देखील लॉकडाऊनच्या कालावधीत जी तत्परता बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करण्यात दाखविली होती. त्याची थोडी तरी सध्या दाखविणे अत्यावश्यक आहे. नाहीतर कासवगतीने प्रत्येक आठवड्यात हा दर वाढत गेल्यास पुन्हा कडक निर्बंधांचा सामना करणे सांगलीकरांना भाग आहे.