पंचगंगेचे पाणी भुयारी बोगद्याद्वारे राजापूरला सोडणार

  सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोल्हापूर शहरात पंचगंगेचे घुसणारे पुराचे पाणी कमी होण्यासाठी ते भुयारी बोगद्याद्वारे राजापूर बंधाऱ्याच्या खाली सोडले जाईल, तर सांगली शहराचे नुकसान कमी करण्यासाठी नदीकाठी पूरसंरक्षक भिंत बांधणार आहे, अशी घोषणा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केली.

  पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनतर्फे सांगलीत शनिवारी पूर परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, दरवर्षी पडणारा पाऊस व येणारा पूर हा वेगळा आहे, आणि यापुढेही असणार आहे. २००५ मध्ये अंदाज न आल्याने सर्वप्रकारची हानी झाली. २०१९ मध्ये प्रचंड पाऊस व विसर्ग यामुळे पुराने सर्वोच्च पातळी गाठली. यावर्षी धरण परिसरात तसेच त्यापुढील भागात प्रचंड पाऊस झाला. यामुळे पाणी वाढण्याची गती मोठी होती. परंतु, पुर्वीच्या दोन्ही पुरांच्या अनुभवामुळे २०२१ मध्ये जीवितहानी फारशी झाली नाही. कर्नाटकने सहकार्य केल्याने अलमट्टीचा विसर्ग वाढविला. तसेच अत्याधुनिक यंत्रणेमुळे पाणी कुठेपर्यंत वाढेल याचा अंदाज होता. त्यामुळे यंदा हानी कमी झाली.

  पुढील काही वर्षात दूरगामी गंभीर परिणाम होऊन परिस्थिती आणखी बिघडणार आहे. पुनर्वसन हा काही पर्याय नाही. लोकसंख्या वाढीमुळे तो शक्य नाही. त्यामुळे पुराचे नियंत्रण हाच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. त्यामुळे शासनस्तरावर काही पर्यायाबाबत गंभीरपणे विचार सुरु आहे. सांगली शहरात पुराचे पाणी घुसल्याने बाजारपेठेसह घरांची मोठी हानी होत आहे. ती टाळण्यासाठी आता नदीकाठी ठिकठिकाणी पूरसंरक्षक भिंत बांधण्याचा विचार सुरु आहे. कृष्णा खोरेतील पाणी भिमा खोऱ्यात देण्याबाबत कायदेशीर अडचणी आहेत. परंतु त्याबाबतही विचारविनीमय सुरु आहे.

  सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, मानवनिर्मित कारणांमुळे महापूर येऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. अतिक्रमण, वाळू उपसा यावर बंधने हवीत. तसेच पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
  यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रमसिंह सावंत, जलतज्ज्ञ राजेंद्र पवार, प्रमोद चौगुले, मयुरेश प्रभुणे यांनी मनोगत व्यक्त केली.

  संयोजक काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. तसेच परिषदेत झालेल्या ठरावांचे वाचन केले. हे ठराव शासनाला पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास महापौर दिग्विजय सुर्यवंशी, नगरसेवक अभिजीत भोसले, अजय देशमुख, राजेंद्र मेथे, जे.के. बापू जाधव, संजय बजाज, नीता केळकर, पद्माकर जगदाळे, दिगंबर जाधव, मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.