…तर तीव्र आंदोलन करणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक

    सांगली : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलचे दरवाढ केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने स्टेशन रोडवरील पेट्रोल पंपावर सरकारचा निषेध करत आंदोलन केले. “मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेची पुन्हा एकदा फसवणूक केली आहे. इंधनाचे दर कमी करावे अन्यथा युवक काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल”, अशा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी दिला.

    यावेळी शहराध्यक्ष सुहेल बलबंड म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्वसामान्य जनतेने आपले रोजगार गमावले आहेत. त्यांच्या घरातील चूल पेटणे कठीण झाले आहे आणि अशातच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोलचे दर ५० रुपयांवरून ५५ रुपये झाले होते. त्यावेळी भाजपने देशभरात आंदोलने केली होती. आता त्यांच्याच मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर दुप्पटीने वाढवले. मग आता भाजपचे नेते, कार्यकर्ते मूग गिळून गप्प का बसले आहेत? असा सवालही बलबंड यांनी उपस्थित केला.

    दरम्यान, सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर वाढवल्याने या देशातील सर्वसामान्य जनतेवर चालत फिरण्याची वेळ आली आहे. म्हणून सरकारचा निषेध करत मोदी सरकारने वाढवलेले दर सर्वसामान्य जनतेला परवडतील, असे जाहीर करावे अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे संभाजी पाटील, उत्कर्ष खाडे, आशिष चौधरी, प्रथमेश जाधव, अरबाज शेख उपस्थित होते.