डोंगरी भागाचा सर्वांगीण विकास व्हावा : तानाजी सावंत

  शिराळा : शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणीसह डोंगरी भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील तरुणांनी आता पुढाकार घेतला आहे. याविषयी मुंबई येथे दोन बैठकी पार पडल्या. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता डोंगरी भागाच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येऊन लढा उभा केला तर डोंगरी भागाचा कायापालट होईल, असे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यानी व्यक्त केले.

  ते शेडगेवाडी (ता.शिराळा) येथे आयोजित डोंगरी विभाग विकास कृति समितीच्या बैठकीत बोलत होते. तानाजी सावंत म्हणाले की, डोंगरी तालुक्यातील लोकांकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी आता जनरेट्याची गरज आहे. आर्थिक स्थिती, रोजगाराची कमतरता, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम डोंगरी भागातील वाड्या-वस्त्या, गावे, खेडी ओसाड पडताना दिसत आहेत. शासनाने आज डोंगरी भागातील समस्यांचा विचार केला नाही तर “गावे-खेडी सोडा व शहरांकडे चला” असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

  डोंगरी भागातील लोकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने विविध योजना आखून स्थलांतर रोखण्यासाठी त्या प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. आज शेडगेवाडी येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातील अनेक गावातील नागरिक उपस्थित होते.

  या आहेत मागण्या

  डोंगरी भाग विकास कार्यक्रम अंतर्गत निधीमध्ये वाढ व्हावी व अति गरज असलेल्या डोंगर पट्ट्यातील गावांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. हा निधी ग्रामपंचायतीमध्ये वर्ग करून खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना मिळावा.

  – स्वतंत्र डोंगरी विकास महामंडळ स्थापन करावे.

  – पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी योजना आखून चांदोली धरणातून गुढेपाचगणी येथे पाणी लिफ्ट करावे व उर्वरित सर्व गावांना पाण्याची सोय लवकरात लवकर करावी.

  – शैक्षणिक प्रश्न व उपाय योजना- डोंगरी भागातील मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे.

  *डोंगरी भागातील मुला/ मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अर्थसहाय्य करावे.

  *इयत्ता ११ वी ते १२ वी व पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना प्रवास भत्ता मिळावा.

  *औद्योगिक शिक्षण घेणाऱ्या डोंगरी भागातील विद्यार्थांना विद्यावेतन मिळावे.

  *डोंगरी भागाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी शासनाने आर्थिक उन्नतीच्या योजना राबवाव्यात.

  * डोंगरी भागातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोगारासाठी कर्ज पुरवठा करणे.

  * कृषिपुरक योजनांमध्ये प्रथम मिळावे.

  *डोंगरी भागातील तरुण/ तरुणींना सैन्य तथा पोलीस दलात भरती होण्यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याची तरतूद करावी.

  * पशुसंवर्धन विभागाच्या योजनांमध्ये प्रथम प्राधान्य मिळावे.

  *अनेक वर्षे प्रलंबित चांदोली पर्यटनाचा विकास करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर पाऊले उचलावीत.

  * अपेक्षित ठिकाणी तालुका क्रीडा संकुलाचे उभारणी करावी.

  *विकेल ते पिकेल योजना प्रभावीपणे राबवून त्यासाठी भरीव निधी मिळावा.

  *आत्मनिर्भर योजनेमध्ये डोंगरी भागासाठी विशेष प्राधान्य देऊन आर्थिक साहाय्य करावे.

  *औषधी पीक उत्पादन घेण्यासाठी शासनाने प्रोत्सानात्मक मदत करावी.

  *कुशल कामगार बनवण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारावे.