जत नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत देणार राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट

    सांगली : जत नगरपरिषदेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचा संदेश समाज माध्यमावर प्रसिद्ध केला असून, भाजपमध्ये नवीन इच्छुकांना संधी मिळावी, या उद्देशाने व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या आदेशावरून सावंत यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने पुन्हा भाजपमधून स्वीकृतसाठी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.

    डिसेंबर २०२२ मध्ये जत नगरपरिषद विद्यमान सदस्यांची मुदत संपणार आहे. याअनुषंगाने राजकीय रणनीती ठरविण्यासाठी पक्षातील इच्छुकांना संधी मिळण्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या आदेशावरून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये गौतम ऐवळे, पापा इस्लामपूर कुंभार, मिथुन भिसे यापैकी एकास दह्यारी (ता. स्वीकृत पदाची लॉटरी लागणार आहे, येथील असे भाजपच्या विश्वासू सदस्यांमध्ये बोलले जात आहे. नगरसेवक उमेश सावंत यांची माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर व विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. सभागृहात आक्रमक चेहरा म्हणून सावंत यांनी गेली तीन वर्षे आपली कामगिरी बजावली आहे. मात्र, स्वीकृत पदाच्या संधीसाठी वर्षाचा ठरलेला फॉर्म्युला मोडीत निघत व काही राजकीय घडामोडींमुळे सावंत यांना मुदतवाढ मिळाली.

    आता येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार विलासराव जगताप यांनी नगरसेवक सावंत यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ते लवकरच राजीनामा देणार असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे. पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.