काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी विक्रम सावंत तर विशाल पाटील प्रदेश उपाध्यक्षपदी

काँग्रेसच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडीचा घोळ अखेर संपला. गुरुवारी जिल्हाध्यक्षपदासाठी जतचे आमदार विक्रम सावंत यांची निवड जाहीर करण्यात आली.

    सांगली : काँग्रेसच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडीचा घोळ अखेर संपला. गुरुवारी जिल्हाध्यक्षपदासाठी जतचे आमदार विक्रम सावंत यांची निवड जाहीर करण्यात आली, तर विशाल प्रकाशबापू पाटील यांची प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सुरुवातीला जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत विशाल यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर मात्र बुधवारी पक्षाच्या झालेल्या बैठकीत सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

    सांगली जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गेले काही दिवस जोरदार रस्सीखेच सुरू होती. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्हाध्यक्षपद बदलायचे असेल, तर ते त्यांच्याच गटाकडे राहिले पाहिजे, असा जोरदार आग्रह धरलेला होता. त्याचवेळी विशाल पाटील यांचेही नाव जिल्हाध्यक्षपदासाठी अग्रेसर होते. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत बैठक झाली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नावाबद्दलही चर्चा झाली. त्यानंतर आमदार सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. विशाल पाटील यांची प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली. सावंत यांच्या अगोदर ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली आहे.

    प्रदेशाच्या निर्णयावर विशाल पाटील नाराज ?

    दरम्यान, प्रदेशाच्या निवडीवरून वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. निवडीसंदर्भात विशाल पाटील म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, या निर्णयाबाबत मला कार्यकर्त्यांशी आधी चर्चा करावी लागेल. त्यानंतर मी पक्षश्रेष्ठींकडे माझा निर्णय सांगेन.