स्वातंत्र्य सैनिकांच्या राज्यस्तरीय स्मारकासाठी प्रयत्नशील : जयंत पाटील

देशभक्त बर्डे गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण

  वाळवा / अतुल मुळीक : क्रांतिवीर देशभक्त बर्डे गुरुजींचे स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींच्या विचाराने स्वतःला झोकून देऊन संपूर्ण आयुष्य देशहितासाठी अर्पण केले. त्यांच्या स्मृती युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. वाटेगाव येथे बर्डे गुरुजींच्या अर्धाकृती पुतळा अनावरण प्रसंगी ते बोलत होते.

  यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जि. प. माजी सभापती बाबासाहेब मुळीक, माजी जि. प. सभापती रवींद्र बर्डे, वाळवा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विजय पाटील, चिमणभाऊ डांगे, माजी जि प अध्यक्ष देवराज पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने, ग चि ठोंबरे, के. डी पाटील , मनिष बर्डे, प्रशांत बर्डे , शिल्पकार विजय गुजर, इंटेरिअर डिझाईनर, शुभदा वाईकर आदी उपस्थित होते.

  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर बर्डे गुरुजी व त्यांच्या पत्नी क्रांतीविरांगणा विजया दादासो बर्डे यांच्या तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

  जयंत पाटील म्हणाले, देशात भांडवलदार धार्जिणे सरकार आहे. जे आहे ते विकण्याची त्यांची मानसिकता आहे. आज देशात आर्थिक पारतंत्र्य निर्माण करण्याच्या घटना घडत आहेत. आताच्या पिढीला स्वातंत्र्य काळातील ब्रिटिशांची जुलमी राजवट माहीत नाही. आज वागण्याचे, लिहिण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवून दिले त्यांच्या स्मृती जपण्याचे काम युवा पिढीने करावे. बर्डे गुरुजींचे स्मारक व पुतळा त्यांचे अलौकिक कार्य येणाऱ्या पिढीला निरंतर प्रेरणा देत राहील.

  मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा वाळवा पेठेतील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले आहे . बर्डे गुरुजींनी पेटलोंड जंगल सत्याग्रह, प्रतिसरकारची स्थापना, १९४२ चे चलेजाव आंदोलन या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका पार पाडली , शिराळा पेठेतील ८६ पोलिस पाटलांचे राजीनामे घेतले.

  स्वातंत्र्य सैनिकांचे लघुपट तयार करा

  आजच्या पिढीला क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान लघुपटाच्या माध्यमातून समजावे. यासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांनी त्याच्या जीवनावरील माहिती एकत्रित करून लघुपट तयार करावेत, असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.