लढणारा कार्यकर्ता हवा, लागेल ती मदत करू : विश्वजित कदम

    वाळवा : नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. आपली हक्काची मते तयार करा. मला लढणारा कार्यकर्ता हवा आहे. तुम्हाला लागेल ती मदत करायला मी तयार आहे, अशी ग्वाही कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी दिली. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

    इस्लामपूर व आष्टा नगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची मते डॉ. कदम यांनी जाणून घेतली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, वाळवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, विजय पवार, राजेंद्र शिंदे, ॲड. आर.आर.पाटील,  प्रा. हेमंत कुरळे, जयदीप पाटील, नंदकुमार कुंभार, संदीप जाधव, सचिन पाटील उपस्थित होते. यावेळी विजय पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

    प्रभागनिहाय कामे करा

    शहरातील प्रभागातील समस्या जाणून घ्याव्यात. वॉर्डनिहाय तयारी करा. आगामी निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल. वॉर्डनिहाय अभ्यास व्हायला हवा. प्रत्येक वॉर्डाची स्वतंत्र निवडणूक असल्याने मतदारांची संख्या, युवक, ज्येष्ठ नागरिक महिला आदींची समीकरणे लक्षात घ्या. सर्वांच्या आशीर्वादाने मंत्रिपदावर कार्यरत आहे. भविष्यात प्रत्येक कार्यकर्त्यांला ताकद देण्याचा प्रयत्न करणार आहे.