….आम्हीही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरच लढू

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अंर्तगत वादानेच पडेल त्यासाठी आम्हाला काही कारण्याची गरज भासणार नाही.

    येत्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांप्रमाणे भाजपही स्वबळावर लढवणार असल्याचं सूतोवाच भाजप नेते, आमदार ॲड.आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे व भाजप यांच्यामध्ये युतीचे होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आशिष शेलार यांनी सांगली दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

    ‘मुंबई महापालिका निवडणूक तुम्ही मनसेला सोबत घेऊन लढणार का? असा सवाल करण्यात आला. त्याला शेलार यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यामुळं महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेणार नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. यामुळं मुंबई महापालिका निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

    राज्यातील महाविकास आघाडी सरकार अंर्तगत वादानेच पडेल त्यासाठी आम्हाला काही कारण्याची गरज भासणार नाही. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हवामान बदलाप्रमाणे आपली वक्तव्य बदलताना दिसतात अशी टीकाही त्यांनी केली आहे.

    सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. फडणवीस सरकारने आरक्षण दिलं. कायद्यात रुपांतर केलं. प्रत्यक्ष फायदा झाला. मुंबई न्यायालयात सर्व युक्तिवाद झाल्यावरही आरक्षण टिकलं. तरीही हे आरक्षण गेलं कसं?, असा सवाल करतानाच हे आरक्षण रद्द होण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा कुटील डाव कालही होता, आजही आहे. सरकारने कोर्टात योग्य रणनीतीच्या आधारे बाजू मांडली नाही हा आमचा आरोप आहे. बाजू मांडताना सर्व कागदपत्रे कोर्टाला दिली नाहीत. जोडपत्राचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलंच नाही. त्यामुळे ती सर्वोच्च न्यायालयात मांडली नाही. म्हणून कोर्टाला वाटलं हा अहवाल एकतर्फी आहे. त्यामुळे कोर्टाने अहवाल फेटाळला. मुकुल रोहतगी यांनीही महाराष्ट्र सरकार योग्य माहीत देत नसल्याने बाजू मांडता येत नसल्याचं कोर्टात म्हटलं. याचा अर्थ आरक्षण न देणे हा सरकारचा कुटील डाव होता, असा दावा त्यांनी केला आहे