…अन्यथा भीक मांगो आंदोलन करणार : बसवराज पाटील

    सांगली : महापूराच्या कालावधीपासून टेलर व्यावसायिक संकटात आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाख टेलर व्यावसायिक असून या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. शासनस्तरावरुन आमच्या व्यवसाय बंधूसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. आमची दुकाने सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी अन्यथा नाईलाजालाने आम्हाला भीक मांगो आंदोलन करावे लागेल, असा इशारा टेलर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष बसवराव पाटील आणि शशिकांत कोपर्डे यांनी पत्रकार बैठकीत दिला.

    पाटील म्हणाले, लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय डबघाईला आलेला आहे. वास्तविक व्यवसाय करताना आमच्याकडून कोरोना आचारसंहितेचे पालन करण्यात येते. बहुतांशी टेलर व्यवायिकांकडे येणारे ग्राहक निश्चित असतात. त्यामुळे त्यांचे माप त्यांच्याकडे लिखीत असते. साहजिकच कित्येकवेळा माप न घेता मागील मापानुसारच कपडे शिवून देण्यात येतात. प्रत्यक्ष माप घेताना देखील आम्ही सुरक्षित अंतर ठेवतो. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जवळपास प्रत्येकाच्या घरी शिलाई मशीन आहे. त्यांचे प्रापंचिक जीवन त्यावरच अवलंबून आहे. सध्या व्यवसायच ठप्प असल्याने त्यांना देखील असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

    पीपीई किट, मास्क शिवण्याचे काम टेलर व्यावसायिकांनी केलेले आहे. एका अर्थाने फ्रंट लाईन वर्कर म्हणूनच ते कार्यरत आहेत. तरी देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानण्यात येते. राज्याचा विचार केल्यास सुमारे २० लाख टेलर व्यावसायिक आहेत. शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात येत असल्यामुळे शासन आमच्या मागण्यांवर विचार करुन निर्णय घेईल अशी आशा आहे. परंतु भविष्यकाळात देखील आमच्याकडे दुर्लक्षच झाल्यास राज्यस्तरीय भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रविण होनमोरे, गोरक्ष व्हनमाने, कबीर गवंडी आदी उपस्थित होते.