सहकार टिकवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवू : मुख्यमंत्री ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, काही लोक दिल्लीला जातात, पण त्यांना तिथे बसायलासुद्धा मिळत नाही, परंतु गुलाबराव पाटील यांना संधी असूनही, ती नाकारली आणि राज्यात येऊन काम करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला. सहकारात त्यांनी केलेले काम आश्चर्यकारक असेच आहे. या क्षेत्रातल्या अडचणी दूर करून त्यांनी ही चळवळ पुढे नेली.

  सांगली : सहकार चळवळीसाठी राजकारण बाजूला ठेवून काम करावे असा विचार पुढे येत असेल तर त्यासाठी आमची तयारी आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनगटात ताकद निर्माण करायचे काम गुलाबराव पाटील यांनी केले. ती हिंमत त्यांनी दाखवून दिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

  सहकार तपस्वी खासदार गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे होते. कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे प्रामुख्याने उपस्थित होते.

  उद्धव ठाकरे म्हणाले, काही लोक दिल्लीला जातात, पण त्यांना तिथे बसायलासुद्धा मिळत नाही, परंतु गुलाबराव पाटील यांना संधी असूनही, ती नाकारली आणि राज्यात येऊन काम करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला. सहकारात त्यांनी केलेले काम आश्चर्यकारक असेच आहे. या क्षेत्रातल्या अडचणी दूर करून त्यांनी ही चळवळ पुढे नेली.

  ते म्हणाले, जी हिम्मत गुलाबरावांनी दाखवली ती आपण का दाखवू नये? त्यांनी संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवला. सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम केले. केंद्रात कोणाचे सरकार आहे, हे महत्त्वाचे नाही. सगळ्यांनी मिळून यातले खडे वेचून काढले तर भाताचा जसा चांगला स्वाद येतो, तसा सहकारातसुद्धा येऊ शकतो.

  जयंत पाटील, रामराजे नाईक – निंबाळकर, प्रवीण दरेकर, पृथ्वीराज पाटील यांनी सहकार परिषद घेऊन यावर विचार करावा, सरकार त्यांच्या पाठीशी राहील असे मी वचन देतो असे ते म्हणाले.

  रामराजे नाईक – निंबाळकर म्हणाले, सहकार चळवळ कशी चालवावी याचा एक सिद्धांतच गुलाबराव यांनी पटवून दिला. त्या काळात काम केलेल्या सहकारातील मोठ्या नेत्यांचा वारसा पुढे नेला पाहिजे. एकविसाव्या शतकात सहकाराचे भवितव्य काय ? यावर विचार मंथन करायला हवे. त्यासाठी जयंत पाटील आदींनी पुढाकार घ्यायला हवा. कार्यकर्त्यांची नवीन फळी निर्माण केली पाहिजे. सहकार चालू राहिला पाहिजे.

  जयंत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी राजकारणापेक्षा सहकार हे एकच क्षेत्र निवडले आणि आयुष्यभर त्यासाठी काम करत राहिले. दुसरा कुठलाही पर्याय त्यांनी स्वीकारला नाही. स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचे काम त्यांनी केले आणि सहकार चळवळीला चांगले दिवस आणले. त्यांच्या विचार पद्धतीने आज सहकार क्षेत्रात काम केले पाहिजे. आज काही संस्था संकटात आहेत, काही बंद आहेत, चुकीच्या गोष्टी घडतात. रिझर्व बॅंकेची बंधने येऊ लागली आहेत.

  बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकार कशा पद्धतीने चालवावा हे गुलाबराव पाटील यांनी या चळवळीला दिलेले अत्यंत चांगले उदाहरण आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी या चळवळीला बळ दिले. वारसदार म्हणून पृथ्वीराज पाटील हे गुलाबरावांचा वारसा चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. सहकार, शिक्षण आणि काँग्रेस पक्षाच्या कामात त्यांनी आपली चमक दाखवली आहे.

  विश्वजीत कदम म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी सहकाराचा पाया मजबूत केलेला होता. भविष्यात त्यांच्या विचाराने या क्षेत्रात चांगले काम करावे लागेल. सहकार चळवळ ही सगळ्यात मोठी चळवळ आहे, त्यावर ग्रामीण जीवन अवलंबून आहे.

  प्रवीण दरेकर म्हणाले, गुलाबराव यांची प्रेरणा घेऊन सहकारात काम करावे लागेल. महाराष्ट्राला त्यामुळे चांगली दिशा मिळू शकते. आज साखर कारखाने अडचणीत येत आहेत, त्यांची पुनर्रचना केली पाहिजे. सहकार एका वेगळ्या वळणावर चालला आहे. सहकारासाठी आता व्यापक आराखडा तयार केला पाहिजे.

  पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून गुलाबराव साहेबांनी काम केले. वर्षभरात गुलाबराव साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त काही कार्यक्रम घेतले. सहकारासाठी नव्याने रचना व्हायला पाहिजे. या उद्देशानेच हा प्रेरणोत्सव आम्ही साजरा करीत आहे. साहेबांचा वारसा गुलाबराव पाटील शिक्षण संकुलाच्या माध्यमातून आम्ही पुढे चालवत आहोत.

  प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या जीवनावरील चित्रफितीचे अनावरण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ही चित्रफित दाखवण्यात आली. आभार अंकुश काकडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन उल्हास पवार यांनी केले. कार्यक्रमास मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि मुंबई येथील सहकार क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

  पुराच्या कारणांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
  सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या कारणांचा आणि उपाययोजनांचा आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सादर करण्यात आला. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने सांगलीत तज्ञांची पूर परिषद घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. पूर नियंत्रणासाठी पूर समिती स्थापन करावी अशी मागणी या अहवालात करण्यात आली आहे. अहवालाची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली.