म्हसवडमध्ये एकाच कुटुंबात १६ कोरोनाबाधित; आता शहर राहणार लॉकडाऊन

  म्हसवड : म्हसवड शहरातील एकाच कुटुंबातील तब्बल १६ जण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे येथील कंन्टेन्मेन्ट झोन पुढील आदेशापर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी आज दिली.

  येथील नागरिक कोरोनाच्या साथीपासून सुरक्षित राहावे, असे शासनाचे प्रामाणिकपणे प्रयत्न व धोरणही आहे. म्हसवड अनलॉक केले तर येथील नागरिकांचे आरोग्य आणखी निश्चितपणे धोक्यात येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन येथील कोरोना साथ आटोक्यात आणण्यास प्रत्येकांनी आपले कर्तव्य समजून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केले आहे.

  दरम्यान, म्हसवड शहर अनलॉक करावे या मागणीसाठी ८ जूनला येथील निवडक संख्येने व्यापारी व नगरसेवकांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले व पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना निवेदन देऊन पालिकेतर्फे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांना दिले होते, त्यानुसार शहर आठवड्यातून ३ दिवस अनलॉक करण्याचे पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र, ८ जूनलाच शहरातील एकाच कुटुंबातील १६ जण बाधित सापडल्याने प्रशासनाने पालिकेच्या वतीने पाठवलेला अनलॉकचा प्रस्ताव फेटाळत शहरातील लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवले आहे.

  आणखी काही दिवस सहकार्य करावे : मुख्याधिकारी

  सातारा जिल्हा लॉकडाऊन होण्यापूर्वीपासून म्हसवड शहरात लॉकडाऊन सुरु आहे. या काळात म्हसवडकर नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास खूप सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी मुख्याधिकारी या नात्याने त्यांचे आभार मानतो. म्हसवडकरांनी एवढ्या दिवस सहकार्य केले आहे. आणखी काही दिवस पालिकेला असेच सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी केले आहे.

  नियमांचे पालन करुन कारवाई टाळावी

  म्हसवड शहरात कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आला असून आजही काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. पोलिस त्यांच्यावर कारवाई करीत आहेत. मात्र, काहीजण शहरात अफवाही पसरवत आहेत. त्यांच्यावर पोलिसांची बारकाईने नजर आहे, कोरोना काळात शासनाच्या नियमांचे पालन करुन प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी व जबाबदारीने वागून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी केले आहे.

  पूर्वीप्रमाणे कंन्टेटमेंट व बफर झोन करावा

  म्हसवड शहरात यापूर्वी ज्या भागात अधिक रुग्ण सापडत होते. तो भाग प्रशासनाकडून कंन्टेटमेंट झोन जाहीर करण्यात येऊन तो परिसर पूर्ण लॉक केला जात होता. तर उर्वरीत परिसर हा बफर झोन जाहीर करुन तेथील अत्यावश्यक सेवा व खाद्यपदार्थ दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली जात होती. सध्या म्हसवड शहरात रुग्णसंख्या ही अत्यल्प असून ज्या ठिकाणी १६ रुग्ण सापडले आहेत. तो परिसर शहरापासून खूप अंतरावर आहे. तोच परिसर कंटेन्टमेंट झोन जाहीर करुन उर्वरीत भाग बफर करुन प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी केली आहे.